Cricket : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर टेस्ट क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा दिग्गज फलंदाज बॉब काउपर याचं रविवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. बॉब काउपरच्या मागे त्याच्या कुटुंबात पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे. बॉब काउपर हा डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज होता. तो त्याची आक्रमक फलंदाजी करायचा आणि मोठ्या खेळींसाठी क्रिकेटविश्वात प्रसिद्ध होता. मात्र एका दीर्घ आजाराने बॉब काउपर याचं निधन झालं.
1966 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर स्टार फलंदाज बॉब काउपरने 307 धावांची कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर एखाद्या फलंदाजाने प्रथमच तिहेरी शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. बॉब काउपरने 1964 आणि 1968 दरम्यान 27 टेस्ट सामने खेळले यात त्याने 48.16 च्या सरासरीने 2061 धावा केल्या आणि 5 शतकं ठोकली.
स्टार फलंदाज बॉब काउपर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वयाच्या 28 व्या वर्षीच निवृत्ती घेतली. विक्टोरियाकडून खेळणाऱ्या बॉबने 83 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आणि त्यापैकी दोनदा त्याने आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका निभावली. बॉबने आयसीसीमध्ये मॅच रेफरी म्हणून सेवा दिली असून तो क्रिकेटशी जोडलेल्या लोकांसाठी सल्लागार म्हणून सुद्धा काम करायचा. 2023 मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेयर्ड यांनी एका शोक संदेशात म्हटले आहे की, 'बॉब काउपरच्या मृत्यूच्या बातमीने आम्हाला खूप वाईट वाटले आहे. तो एक महान फलंदाज होता आणि एमसीजीवरील त्याचे तिहेरी शतक नेहमीच लक्षात राहील. 1960 च्या दशकात त्याने ऑस्ट्रेलियन आणि व्हिक्टोरियन संघांमध्ये मोठी भूमिका बजावली.