IPL 2025 पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, बोर्डाने 5 वर्षे जुनी बंदी हटवली!

IPL 2025 BCCI Saliva Rules Change: 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगच्या 18 व्या हंगामाच्या अगदी 2 दिवस आधी बोर्डाने आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 20, 2025, 06:29 PM IST
IPL 2025 पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, बोर्डाने 5 वर्षे जुनी बंदी हटवली!
बीसीसीआय नियम

IPL 2025 BCCI Saliva Rules Change: शनिवार, 22 मार्च 2025 इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये सर्वच टीममध्ये खेळाडूंपासून कॅप्टनपर्यंत महत्वाचे बदल झाले आहेत. दरम्यान या नवीन हंगामात एक जुना नियम परत आलाय. ज्याचा मैदानात खेळाडूंवर परिणाम दिसून येणार आहे. काय आहे हा नियम? खेळाडूंवर कसा होईल परिणाम? सविस्तर जाणून घेऊया. 

आयपीएल 2025 हंगाम सुरू होण्याच्या 2 दिवस आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे गोलंदाजांना मोठा दिलासा दिला आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यावेळी चेंडूवर लाळ न लावण्याचा नियम आणण्यात आला होता. चेंडू चमकवण्यासाठी बॉलर्स लाळेचा वापर करत असतात. पण 2020 मध्ये कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली. यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली. नंतर हा नियम आयपीएलमध्येही लागू करण्यात आला.

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगच्या 18 व्या हंगामाच्या अगदी 2 दिवस आधी बोर्डाने आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे गोलंदाजांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी 20 मार्च रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात सर्व 10 टीमचे अधिकारी आणि कर्णधार यांच्यात एक बैठक झाली. यामध्ये बोर्डाने सर्व कर्णधारांना या निर्णयाची माहिती दिली. 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापासून गोलंदाज आता आयपीएलमध्ये पूर्वीप्रमाणेच चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरू शकतील, असा याचा अर्थ होतो. 

असे असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही बंदी अजूनही कायम आहे. कोरोना महामारी संपल्यानंतर आयसीसीने तो नियम लागू केला तो कायमसाठीच ठेवला. खेळाडू लाळ नव्हे तर फक्त त्यांच्या घामाचा वापर करून चेंडू चमकू शकतात. पण गेल्या काही काळापासून ही बंदी उठवून जुन्या काळाप्रमाणे लाळेचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी होत होती. काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही ही बंदी हटवण्याची मागणी केली होती. आता बोर्डाने यावर तातडीने कारवाई करत बंदी हटवली आहे.

नव्या 18 व्या हंगामापासून आता आयपीएलमध्ये आणखी एक महत्त्वाचा नियम येणार आहे. संध्याकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी दुसऱ्या डावात दोन चेंडू वापरले जातील. याअंतर्गत दुसऱ्या डावात गोलंदाजी करणारी टीम 10 व्या षटकापर्यंत नवीन चेंडू वापरू शकेल. यानंतर 11 व्या षटकापासून चेंडू बदलला जाईल आणि उर्वरित सामना त्यासोबत पूर्ण केला जाईल. असे असले तरी हा दुसरा चेंडू नवीन नसेल पण थोडा जुना असेल. चेंडू बदलणे अनिवार्य असणार की फिल्डींग करणारी टीम त्यांच्या मर्जीनुसार ते करू शकते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.