BCCI ला रोहित शर्मा नकोसा झालाय? लवकरच ODI चं कर्णधारपदही काढणार; आगरकरचा मास्टर प्लॅन?

BCCI Plan About Rohit Sharma: रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापूर्वीच तो अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्त झालाय. असं असतानाच आता तो किती काळ एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर राहणार हे पाहणं महत्त्वाच आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2025, 08:33 AM IST
BCCI ला रोहित शर्मा नकोसा झालाय? लवकरच ODI चं कर्णधारपदही काढणार; आगरकरचा मास्टर प्लॅन?
रोहितचं एकदिवसीय क्रिकेटचं कर्णधारपदही जाणार?

BCCI Plan About Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ सध्या कात टाकतोय. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी नव्या खेळाडूंसाठी वाट मोकळी करुन दिली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यापूर्वीच दोघांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मागील 15 वर्षांपासून  क्रिकेटची सेवा करत चाहत्यांना मनमुराद आनंद देणाऱ्या या दोन्ही दिग्गजांना आता अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकेच अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणार आहेत. हे दोघे केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रीय असणार आहेत. त्याशिवाय हे दोघे आयपीएलसारख्या स्पर्धेत दिसतील. अंतरराष्ट्रीय स्तरावर 2027 साली होणारा एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप खेळून निवृत्त होण्याचा या दोघांचा विचार दिसत आहे. 

रोहितसाठी वाट बिकट

सध्या वर्ल्डकपची स्पर्धा दोन वर्ष दूर आहे. त्यावेळेस रोहित शर्मा 40 वर्षांचा असेल आणि विराटही चाळीशीच्या आसपास असेल. दोघांनाही वर्ल्डकप खेळायची इच्छा नक्कीच असणार. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाचं आणि निवड समितीचं वेगळं नियोजन सुरु असल्याची दाट शक्यता आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट निवड समितीच्या भविष्यातील योजनांमध्ये या दोघांपैकी रोहितला जागा नसल्याचे संकेत मिळत आहेत. विराट हा रोहितपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक चपळ असून अजूनही त्याचा फॉर्म उत्तम आहे. त्याची फलंदाजीही उत्तम असल्याने रोहितच्या तुलनेत विराट 2027 चा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता अधिक आहे. रोहितसाठी 2027 वर्ल्डकप खेळणं अत्यंत कठीण मानलं जात आहे. 

...म्हणून रोहित कर्णधार असण्याची शक्यता कमीच

रोहित शर्माने 2023 च्या वर्ल्डकपपासून आपल्या फलंदाजीची शैली बदलली. रोहित अधिक आक्रमकपणे खेळतो. मात्र आता वय वाढत असल्याने रोहितला हे असं खेळत राहणं किती दिवस जमणार हे सांगता येत नाही. याचप्रमाणे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार नसणार अशा बातम्याही समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये रोहितला कर्णधारपदासंदर्भातील कारभार झेपवणार नाही असं सांगितलं जात आहे. सामान्यपणे आताचा कर्णधार निवृत्त होताना पुढील कर्णधार कोण असेल हे हेरुन त्याला मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ धोनीला तो 2019 च्या वर्ल्डकपनंतर खेळणार नाही हे ठाऊक असल्याने 2017 मध्ये विराट कोहलीकडे ओडीआयचं नेतृत्व सोपवण्यात आलं. असाच काहीसा प्रकार रोहितसोबत होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळला तरी तो कर्णधार म्हणून नक्कीच हा वर्ल्डकप खेळणार नाही. 

आगरकरला नको रोहित?

अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील नव्या धोरणांनुसार भारताचे सध्या तीन कर्णधार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित, टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव आणि आता कसोटी क्रिकेटसाठी शुभमन गिलची नियुक्ती कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. मात्र ही परिस्थिती फार काळ राहील असं वाटत नाही. "आम्हाला (बीसीसीऐआयला) असं वाटलेलं की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटपासून दूर जाईल, निवृत्त होईल. रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भवितव्याबद्दल त्याच्यात आणि भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये काहीही चर्चा झालेली नाही," असं सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माने आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नसल्याचं सांगितलेलं.  मात्र भविष्याचा विचार करुन कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याबद्दल अजित आगरकर ठाम असल्याचे समजते. त्यांच्या योजनेत रोहितला कर्णधार म्हणून स्थान नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

रोहितचं दमदार रेकॉर्ड

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मागील तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारत केवळ एकदिवसीय वर्ल्डकपचा अंतिम सामना हारला आहे. रोहितने दोन वर्षात भारताला टी-20 वर्ल्डकप आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. बांगलादेशचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार झाला तर भारतीय संघ ऑगस्टमध्ये एकदिवसीय सामना खेळेल. हा दौरा रद्द झाला तर थेट ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेलणार आहे.