)
Sana Mir Kashmir Row: महिला विश्वचषक 2025 मधील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान समालोचन करताना पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर हिने केलेल्या वक्तव्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. खेळाडू नतालिया परवेज हिला "पाकिस्तान-प्रशासित काश्मीर"ऐवजी "आझाद काश्मीर"मधील असल्याचं म्हटल्याने भारतीय चाहत्यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आयसीसीकडे कारवाईची मागणी झाली आहे.
समालोचनादरम्यान सना मीर म्हणाली होती “नतालिया, जी काश्मीर… म्हणजे आझाद काश्मीरमधून येते, तिला आपलं क्रिकेट खेळण्यासाठी लाहोरला यावं लागतं.” तिच्या या बदललेल्या शब्दप्रयोगावरूनच वाद सुरू झाला. चाहत्यांनी हे क्रिकेटच्या मैदानावर राजकारण ओढल्याचं म्हणत तिला टीकेचं लक्ष्य केलं.
Player ‘from Azad Kashmir’ is this kind of commentary allowed?
— Lala (@FabulasGuy) October 2, 2025
And then they say keep politics away from sports. pic.twitter.com/1HSHjRWMZG
हा व्हिडीओ प्रसारित होताच भारतीय चाहत्यांनी आयसीसी, बीसीसीआय आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली. अनेकांनी खेळाचं राजकारण करणं थांबवावं असंही म्हटलं.
या वादानंतर सना मीरने एक्स (माजी ट्विटर)वर तीन स्पष्टीकरण दिलं. तिने म्हटलं, “माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला आहे. माझा उद्देश फक्त त्या खेळाडूच्या संघर्षांविषयी बोलण्याचा होता. इथे राजकारण आणण्याचा अजिबात हेतू नव्हता.” मात्र, तिने माफी मागितली नाही. सना मीरने पुढे सांगितलं की, समालोचक म्हणून खेळाडू कुठून आले, त्यांची कहाणी काय आहे हे सांगणं ही नेहमीची पद्धत आहे. नतालियाबरोबर इतर काही खेळाडूंचंही तिने असंच वर्णन केल्याचं स्पष्ट केलं.
It's unfortunate how things are being blown out of proportion and people in sports are being subjected to unnecessary pressure. It is sad that this requires an explanation at public level.
— Sana Mir ثناء میر (@mir_sana05) October 2, 2025
My comment about a Pakistan player's hometown was only meant to highlight the challenges… pic.twitter.com/G722fLj17C
स्पष्टीकरणात सना मीरने ईएसपीएनक्रिकइन्फोचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये नतालिया परवेज हिचं ठिकाण ‘आझाद जम्मू अँड काश्मीर’ असं नमूद केल्याचं दिसतं. आता मात्र त्या वेबसाईटवर तिचं ठिकाण ‘पाकिस्तान-प्रशासित काश्मीर’ असं अपडेट करण्यात आलं आहे.
या संपूर्ण वादामुळे प्रत्यक्ष सामना झाकोळून गेला. पाकिस्तान महिला संघाला बांगलादेशकडून पहिल्याच सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला, मात्र लोकांच्या चर्चेत फक्त सना मीरचं विधानच अधोरेखित झालं.