Champions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार

India vs NewZealand:  चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

शिवराज यादव | Updated: Mar 2, 2025, 10:05 PM IST
Champions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार

India vs New Zealand:  चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंड सहजपणे हा सामना जिंकेल असं वाटत असताना भारताने उत्तम खेळी करत हा सामना जिंकला. भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत न्यूझीलंड संघाला पराभवाची धूळ चारली आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. 

Add Zee News as a Preferred Source

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि स्टार स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. वरुणने 5 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं. अशाप्रकारे भारतीय संघ आपल्या ए-ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. आता भारत संघ 4 मार्चला दुबईत सेमी-फायनल खेळणार आहे. ग्रुप-बीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाशी भारतीय संघाचा सामना होणार आहे. तर दुसरा सेमी-फायनल सामना 5 मार्चला लाहोरमध्ये होईल. या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडेल. 

न्यूझीलंडची सुरुवात खराब

250 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. रचिन रवींद्रने स्वस्तात आपली विकेट गमावली. हार्दिक पांड्याने त्याला 6 धावांत माघारी धाडलं. यानंतर विल यंग वरुणच्या गोलंदाजीवर बाद झालं. विकेट पडू लागल्यानंतर विल्यम्सन एकहाती संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. पण अक्षर पटेलने 81 धावांवर असताना त्याला बोल्ड केलं. यानंतर न्यूझीलंड संघ पराभवाच्या दिशेने गेला आणि भारत विजयी झाला.

अय्यरच्या अर्धशतकामुळे भारतीय फलंदाजी सावरली

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावत 249 धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये भारताने 3 विकेट गमावले. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट स्वस्तात माघारी परतले. यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागिदारी केली. दुसरीकडे श्रेयसने 75 धावांत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अक्षरने 42 धावा केल्या. 

यानंतर के एल राहुल आणि श्रेयस अय्यरने 44 धावांची भागीदारी केली. श्रेयस लयीत दिसत होता. त्याने 98 चेंडूत 79 धावा केल्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्याने जलद फलंदाजी करत 45 धावा केल्या होत्या. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More