'शरियाच्या दृष्टीने मोहम्मद शमी गुन्हेगार' सेमी फायनलमधील 'तो' फोटो पाहून मौलाना भडकले

champions trophy 2025: अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल विधान केलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Mar 6, 2025, 04:50 PM IST
'शरियाच्या दृष्टीने मोहम्मद शमी गुन्हेगार' सेमी फायनलमधील 'तो' फोटो पाहून मौलाना भडकले
मोहम्मद शमी

champions trophy 2025: वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली. विराट कोहलीच्या धावसंख्येसोबतच या विजयात बॉलर्सचा मोठा वाटा होता. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मॅचदरम्यान कोल्ड्रींग पिताना दिसला. यानंतर समाज माध्यमात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यातील बहुतांश जणांनी मोहम्मद शमीचं कौतुक केलं. राष्ट्र सर्वप्रथम ही भावना लक्षात घेऊन शमीने रोझा सोडला असं म्हटलं गेलं. पण शमीला विरोध करणाऱ्यांची संख्यादेखील वाढताना दिसतेय. त्याला मुस्लिम धर्मातील मौलानांकडून विरोध होतोय.   

Add Zee News as a Preferred Source

अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल विधान केलंय. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीने खेळादरम्यान रोझा न ठेवून चूक केली, असे ते म्हणाले. 

काय म्हणाले मौलाना शमीबद्दल ?

'रोझा' (उपवास) हा अनिवार्य कर्तव्यांपैकी एक आहे. जर एखाद्या निरोगी पुरुष किंवा स्त्रीने 'रोझा' पाळला नाही तर तो किंवा ती एक मोठा गुन्हेगार ठरु शकतो. भारतातील प्रसिद्ध क्रिकेट व्यक्तिमत्व मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान पाणी किंवा इतर कोणतेतरी पेय घेतले. यावेळी लोक त्याच्याकडे पाहत होते. जर तो खेळत असेल तर याचा अर्थ तो निरोगी आहे. अशा परिस्थितीत त्याने 'रोझा' पाळला नाही आणि पाणीही प्यायले. यामुळे लोकांना चुकीचा संदेश जातो, असे मौलाना म्हणाले. 'रोझा' न पाळून मोहम्मद शमीने गुन्हा केलाय. त्याने हे करू नये. शरियाच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे. त्याला देवाला उत्तर द्यावे लागेल, असेही मौलाना पुढे म्हणाले. 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यादरम्यान शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शमी हा इस्लाम धर्माचं पालन करतो. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम धर्मीयांचे रोझे म्हणजेच धार्मिक उपवास असतात. या कालावधीत सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान कोणतीही गोष्ट खाल्ली अथवा प्यायली जात नाही.मोहम्मद शमीने उपवास न ठेवून काहीही चुकीचे केले नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली होती. देश हा नेहमीच धर्मापेक्षा मोठा असतो.', अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमी चमकला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शमीने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 48 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने कपूर कॉनोली, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन एलिस यांचे विकेट घेतले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More