)
Cricketer Opens Up on Depression: भारतीय लेगस्पिनर अमित मिश्रा यांनी गुरुवारी आपल्या 25 वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला. 2008 मध्ये कसोटी पदार्पणात 5 विकेट्स घेत जोरदार एन्ट्री करणाऱ्या मिश्रा यांनी निवृत्तीनंतर भावनिक खुलासा केला आहे. तो काही काळ नैराश्येत (डिप्रेशनमध्ये) गेला होता, मात्र स्वतःशी संवाद साधून त्याने पुन्हा मैदानावर दमदार पुनरागमन केले.
अमित मिश्राने 2003 मध्ये वनडे पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टीव्हीएस कपमध्ये त्याने पहिल्याच सामन्यात 5 षटके टाकत 29 धावांत 1 बळी घेतला. मात्र पदार्पणानंतर तब्बल पाच वर्ष त्याने संघात स्थान मिळाले नाही. कारण त्या काळात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह सातत्याने शानदार कामगिरी करत होते. अखेर 2008 मध्ये कुंबळे दुखापतीमुळे बाहेर गेल्यावर मिश्राला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने ती गमावली नाही.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा म्हणाला, "जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी चांगली कामगिरी केली. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळलो, मोठ्या स्टेजवर खेळलो, पण काही काळ मी खूप खचून गेलो. जवळपास दीड-दोन वर्ष मी उदास होतो. राग यायचा, मी प्रदर्शन करत होतो पण तरीही सिलेक्शन होत नव्हतं. नंतर मी स्वतःशी बोलायला सुरुवात केली."
मिश्रा पुढे म्हणाला,"मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो की मी क्रिकेट खेळतोय, तर हे आणखी कसं चांगलं करता येईल? माझ्या छोट्या छोट्या कामगिरीत काय भर घालता येईल? आणि मी ध्यान करायला सुरुवात केली. त्यानंतर क्रिकेटचा खरा आनंद घेऊ लागलो."
अमित मिश्राने भारतासाठी एकूण 68 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 156 बळी घेतले. ते हरियाणासाठी घरगुती क्रिकेट खेळत राहिले. आयपीएलमध्ये तर ते सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक मानले जातात. त्याच्या हॅट्रिक विक्रमाने त्याला लीगच्या इतिहासात वेगळी ओळख मिळवून दिली.