'2019 ला इंग्लंडने...', भारताच्या विजयानंतर टीकाकारांचा गावसकरकडून मोजक्या शब्दात उद्धार

CT 2025 Sunil Gavaskar On India Win: इतर आठ संघांपेक्षा भारताला उजवं माप मिळाल्याचा आरोप स्पर्धेनंतर केला जात असतानाच गावसकरांनी यावरुन सडेतोड उत्तर दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 13, 2025, 11:41 AM IST
'2019 ला इंग्लंडने...', भारताच्या विजयानंतर टीकाकारांचा गावसकरकडून मोजक्या शब्दात उद्धार
गावसकरांचा हल्लाबोल (फाइल फोटो)

CT 2025 Sunil Gavaskar On India Win: भारतीय संघाने रविवारी (9 मार्च रोजी) दुबईतील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडच्या संघावर 4 गडी राखून मात करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफिवर नाव कोरल्यापासून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय संघाला एकाच मैदानात सर्व सामाने खेळता आल्याने ही स्पर्धा जिंकता आल्याची बोंब काही माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. खास करुन परदेशातील माजी क्रिकेटर्सने हा मुद्दा अनेकदा मांडला आहे. मात्र यावरुनच आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल आथर्टन आणि नासीर हुसैन या दोघांना खडेबोल सुनावलेत. 

हे दोघे नेमकं काय म्हणालेले?

भारतीय संघाला एकाच मैदानात सामने खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांना गरज नसताना झुकतं माप देण्यात आल्याचा उल्लेख मायकेल आथर्टन आणि नसीर हुसैनने केला. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला. त्यामुळेच अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तानी क्रिकेट नियामक मंडळाने भारताचे सर्व सामने त्रयस्त ठिकाणी म्हणजेच दुबईमध्ये खेळवले जातील असं निश्चित करण्यात आलं.  

भारताने स्पर्धेच्या सुरुवातीलाच बांग्लादेश आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल आथर्टन आणि नासीर हुसैन या दोघांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सर्वात जमीचे बाजू म्हणजे इतर संघांप्रमाणे त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये सामने खेळण्यासाठी सतत प्रवास करावा लागत नाही, असं म्हणत टीका केली होती. तसेच मैदानातील खेळपट्टी आणि वातावरणानुसार संघ निवडण्याची चिंताही भारताला एकाच मैदानात खेळत असल्याने करावी लागली नाही असं या दोन माजी खेळाडूंनी म्हटलेलं. 

इतर खेळाडूंकडूनही अशीच टीका

विशेष म्हणजे अशाच पद्धतीची टीका सध्या सक्रीय असलेले इंग्लंडच्या संघातील क्रिकेटपटू जॉस बटलर, डेव्हिड मिलर आणि राईस व्हॅन डर डुसैन यांनीही स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल आक्षेत घेतल्याने भारताविरूद्धच्या टीकेला अधिक धार प्राप्त झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली.

नक्की वाचा >> 'सारं काही सोडून जाताना तुम्हाला...'; विराटकडून निवृत्तीचे संकेत? नेमकं काय म्हणाला पाहा

गावसकरांनी बंद केली बोलती

मात्र अनेकदा कॉमेंट्री बॉक्सपासून चर्चा सत्रांपर्यंत भारताविरोधात बोलणाऱ्या सुनील गावसकरांनी पुन्हा एकदा असा प्रतिक्रिया नोंदवणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. गावसकरांनी या अशा प्रतिक्रिया 'नाकारात्मक' आहेत असं म्हटलं आहे. आयसीसीने डिसेंबर महिन्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. तेव्हा भारताचे सर्व सामने दुबईमध्ये होतील हे स्पष्ट झाल्यानंतर लगेच आक्षेप घ्यायला हवा होता, असं गावसकरांनी म्हटलं आहे.

...तर स्पर्धेतील पहिला चेंडू टाकण्याआधीच...

"भारताला एकाच जागी खेळावं लागल्याने दोन सामन्यांमध्ये प्रवास करावा लागला नाही हे झुकतं माप मिळालं अशी चर्चा होताना दिसेल. मात्र मात्र हे सारं आयसीसीे ठरवलं आहे. तसेच हे सारं मालिका सुरु होण्याच्या आधीच ठरलेलं. अशा काही नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर स्पर्धेतील पहिला चेंडू टाकण्याआधीच नोंदवायला हव्या होत्या," असं गावसकर यांनी 'स्टारस्पोर्ट्स'साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'भारतीय संघ पाकिस्तानात खेळला असता तर...'; 'दुबईत खेळले' टीकेवरुन अक्रम स्पष्टच बोलला

इंग्लंडच्या 2019 च्या विजयापूर्वी...

गावसकरांनी मायकल आथर्टन आणि नासीर हुसैन या दोघांना सुनावलं आहे. आयसीसीच्या सर्वाधिक स्पर्धा भरवणाऱ्या इंग्लंडला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा का घेता आला नाही? असा सवाल गावसकरांनी विचारला आहे. "घरच्या मैदानांवर खेळण्याच्या फायद्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हे भारताच्या विजयाचं कारण आहे असा विचार केला तर मग इंग्लंडचा असं का करता आलं नाही? 2019 ला इंग्लंडने आयसीसीची पहिली ट्रॉफी जिंकण्याआधी त्यांनी अर्धा डझनहून अधिक आयसीसीच्या स्पर्धा आपल्या देशात भरवल्या होत्या," असा टोला गावसकरांनी लगावला आहे. हा सवाल विचारत गावसकरांनी इंग्लंडच्या संघाची लाजच काढल्याची चर्चा आहे.