)
Dabang Delhi Won PKL 2025: प्रो कबड्डी लीग (PKL) 2025 चा शिखर सामना थरारक आणि तुफानी रंगला! दबंग दिल्ली के.सी. आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीने ३१-२८ अशी नजीकची आघाडी घेत दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या रोमांचक फायनलमध्ये दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ सादर केला. दबंग दिल्लीकडून नीरज नरवालने दमदार प्रदर्शन करत सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली, तर अजिंक्य पवारनेही ६ गुणांची भर घातली. पुणेरी पलटनकडून आदित्य शिंदेने आपलं सुपर १० पूर्ण करत संघाला शेवटपर्यंत लढवले, मात्र शेवटच्या क्षणी दिल्लीने सामना पलटवला आणि विजेतेपद आपल्या नावावर केलं.
सामन्याची सुरुवातच चुरशीची झाली. पलटनचा कर्णधार अस्लम इनामदार पहिली चढाई करण्यासाठी मैदानात उतरला आणि बोनस घेऊन संघाला दमदार सुरुवात दिली. दिल्लीकडून आशू मलिकची पहिली रेड थोडी धोकादायक ठरली पण पंचांनी त्याला ‘सेफ’ घोषित केलं. यानंतर दोन्ही संघांमध्ये गुणांची सतत अदलाबदल सुरू होती.
सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांत दिल्लीने ६-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुणेरी पलटनने डू-ऑर-डाय रेडमध्ये पंकज मोहितेच्या शानदार खेळीमुळे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र १३ व्या मिनिटाला पलटनने केलेल्या तिसऱ्या सुपर टॅकलनंतरही दिल्लीने पलटवार करत पुण्याला ऑलआऊट केले आणि १४-८ अशी महत्त्वाची आघाडी घेतली.
पहिल्या अर्ध्यानंतर दिल्ली २०-१४ अशा फरकाने पुढे होती. दुसऱ्या अर्ध्यात पुणेरी पलटनने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण दिल्लीच्या बचावाने भक्कम भिंत उभी केली. नीरज नरवाल आणि विशाल भरद्वाज यांनी निर्णायक क्षणी केलेल्या पकडींमुळे दिल्लीने आपली पकड घट्ट ठेवली.
सामन्यातील शेवटच्या ५ मिनिटांत दिल्ली २७-२० अशी आघाडीवर होती. पुणेरी पलटनने शेवटच्या मिनिटांत जबरदस्त प्रयत्न केला — आदित्य शिंदेने दोन गुण घेत संघाला पुन्हा शर्यतीत आणले आणि फरक फक्त २ गुणांवर आणला. पण शेवटच्या क्षणी दबंग दिल्लीने रणनीती बदलत पलटनचा शेवटचा हल्ला परतवला आणि सामना ३१-२८ ने जिंकला.
दिल्लीचा नीरज नरवाल याने आपल्या स्मार्ट रेडिंग आणि शांत बचावामुळे सामन्याचा ‘हिरो’ ठरला. त्याच्या ९ गुणांच्या कामगिरीमुळे दिल्लीने इतिहास रचत दुसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगचे जेतेपद पटकावले.