)
फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध अखेरच्या क्षणी निसटलेल्या विजयामुळे इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसम हसन प्रचंड संतप्त झाले आहेत. २-० अशी आघाडी मिळवूनही ३-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी सामन्यातील पंचांच्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. इतकेच नव्हे, तर "आमच्यावर अन्याय झाला" असा थेट आरोप करत त्यांनी स्पर्धेच्या निष्पक्षतेवरही शंका व्यक्त केली. सामन्याच्या सुरुवातीला यासेर इब्राहिमच्या गोलमुळे इजिप्तने आघाडी घेतली. त्यानंतर मोस्तफा झिकोने आणखी एक गोल केला होता, मात्र व्हीएआरच्या हस्तक्षेपानंतर तो रद्द करण्यात आला. त्यानंतर झिकोने पुन्हा गोल करत इजिप्तला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली आणि संघ प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या उंबरठ्यावर दिसत होता.
मात्र, गतविजेत्या अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन केले. क्रिस्टियन रोमेरोने पहिला गोल करत सामना रंगतदार केला. पहिल्या हाफमध्ये पेनल्टी दवडलेल्या लिओनेल मेस्सीने नंतर बरोबरी साधली. त्यानंतर एन्झो फर्नांडेझने निर्णायक गोल करत अर्जेंटिनाला ३-२ असा विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर होसम हसन यांनी पंचांच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, अर्जेंटिनाच्या विजयी गोलाच्या आधी हमदी फथीवर झालेल्या फाऊलबद्दल इजिप्तला पेनल्टी मिळायला हवी होती. मात्र, त्या प्रसंगाची व्हीएआरवरही योग्य तपासणी झाली नाही, असा त्यांचा आरोप आहे. तसेच झिकोचा रद्द करण्यात आलेला गोलही त्यांना अन्यायकारक वाटत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेत बोलताना हसन म्हणाले, "आज आम्ही दुर्दैवी ठरलो असं म्हणणार नाही. आमच्यासोबत सरळसरळ अन्याय झाला. मैदानावर ना निष्पक्षता दिसली, ना आमच्या संघाला योग्य सन्मान मिळाला."
इतकंच नव्हे, तर त्यांनी स्पर्धेतील पंचांवर आणि निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "आमच्या खेळाडूचा जर्सी ओढल्याचं सर्वांनी पाहिलं, पण त्या प्रसंगाची व्हीएआरवर तपासणीही झाली नाही. मग तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका कशासाठी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हसन यांनी पुढे धक्कादायक विधान करत सांगितले की, या अनुभवामुळे ते आता विश्वचषकातील उर्वरित सामने पाहणार नाहीत. "माझ्या निषेधाची हीच पद्धत आहे," असे ते म्हणाले.
मेस्सीबाबत बोलताना हसन यांनी सूचक आरोपही केला. त्यांच्या मते, स्पर्धेतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या मेस्सीला स्पर्धेत कायम ठेवण्याचा दबाव अधिकाऱ्यांवर असू शकतो. "कदाचित विद्यमान विश्वविजेते स्पर्धेत राहावेत, अशी काहींची इच्छा होती. कदाचित मेस्सी पुढे जावा, अशी अपेक्षाही होती. फुटबॉलमध्ये कधी कधी मैदानावरील खेळापेक्षा इतर गोष्टी अधिक प्रभाव टाकतात," असे त्यांनी म्हटले.
Messi asked Egypt coach: What's wrong with you?#Messi #HossamHassan #ArgentinaVsEgypt #WorldCup2026 #Injusticepic.twitter.com/ubqvlxtRTf
— (@HFakhar_Islam) July 7, 2026
होसम हसन यांनी सामन्याच्या वेळापत्रकावरही नाराजी व्यक्त केली. बाद फेरीतील सामना दुपारी १२ वाजता ठेवण्याचा निर्णय खेळाडूंसाठी अयोग्य असल्याचे सांगत, "अशा वेळेला सामना ठेवणाऱ्यांनी कधी फुटबॉल खेळलेलाच नसावा. खेळाडूंनी सकाळी साडेसातला नाश्ता करून मैदानात उतरायचं का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या सामन्यात मेस्सीची पेनल्टी इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेरने रोखली होती. मात्र त्यानंतर मेस्सीने पुनरागमन करत महत्त्वाचा गोल नोंदवला आणि अखेरीस अर्जेंटिनाने रोमांचक विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
पराभवानंतर इजिप्तचा आघाडीचा खेळाडू मोस्तफा झिको यालाही भावना आवरता आल्या नाहीत. सामन्यानंतरच्या मुलाखतीदरम्यान तो अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसला. पंचांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत त्याने रेफ्रींवर कठोर शब्दांत टीका केली. झिकोच्या मते, सामन्यात इजिप्तला न्याय मिळाला नाही. भावना व्यक्त करताना त्याने "अल्लाहच आमच्यासाठी पुरेसा आहे, तोच सर्वोत्तम न्याय करणारा आहे," असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर त्याने, "एका संपूर्ण देशाच्या मेहनतीवर पाणी फिरवलं गेलं," अशा शब्दांत आपली खंत मांडली.
मुलाखतीच्या अखेरीस झिकोने आणखी एक वादग्रस्त दावा केला. त्याच्या मते, स्पर्धेचा कल अर्जेंटिनाच्या बाजूने झुकलेला दिसत होता. विशेष म्हणजे, हे विधान केल्यानंतर त्याची मुलाखत अचानक थांबवण्यात आल्याचंही पाहायला मिळालं.
