)
End Of An Era Rohit Sharma Post: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. संघाच्या या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याबद्दल. टेस्ट मालिकेनंतर आता शुभमन गिलला वनडे संघाचं नेतृत्वही सोपवण्यात आलं आहे. म्हणजेच रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. या निर्णयावर देशभरातून मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही चाहत्यांना हा बदल योग्य वाटतोय, तर काहींना ‘हिटमॅन’सारख्या अनुभवी कर्णधाराला हटवणं योग्य नाही असं वाटतंय. याच दरम्यान रोहित शर्माची एक जुनी पोस्ट पुन्हा समोर आली आहे, ज्यामुळे विश्व क्रिकेटमध्ये एकदम खळबळ उडाली आहे.
वनडे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माची 13 वर्षांपूर्वीची एक पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. 14 सप्टेंबर 2012 रोजी रोहितने ट्विटरवर लिहिलं होतं, “एक युग संपलं (45) आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली (77).” रोहितचा जर्सी नंबर कायमच 45 राहिला आहे, तर शुभमन गिलचा जर्सी नंबर आहे 77. त्या काळात या पोस्टकडे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण आता 2025 मध्ये तिचं संदर्भानुसार महत्त्व वाढलं आहे.
रोहितचा तो जुना ट्वीट आणि सध्याची परिस्थिती अगदी जुळून येतेय. जर्सी नंबर 77 असलेला शुभमन गिल आता भारताच्या वनडे संघाचा कर्णधार आहे, तर 45 नंबरचा हिटमॅन कर्णधारपदावरून बाहेर झाला आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, रोहित शर्मानेही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात 77 नंबरची जर्सी परिधान केली होती, मात्र फार कमी चाहत्यांना हे माहित आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शुभमन गिल याच मालिकेतून आपलं नवं नेतृत्व दाखवणार आहे. हीच मालिका 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या नव्या आराखड्याची सुरुवात ठरू शकते.
— BCCI (@BCCI) October 4, 2025
Asia Cup 2023
ICC Champions Trophy 2025
A salute to the ODI Captaincy tenure of Rohit Sharma #TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/hdj8I3zrQT
रोहित शर्मा डिसेंबर 2021 मध्ये भारताचा फुल टाइम वनडे कर्णधार झाला. 2023 विश्वचषकात त्याने भारताचं नेतृत्व केलं आणि संघाला सलग 10 विजय मिळवून दिले. जरी अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमवावा लागला, तरी त्याच वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी20 वर्ल्ड कप अपराजित राहून जिंकला. तसेच 2025 मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात ICC चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली.

‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू भारतासाठी ट्रॉफी विजेता कर्णधार ठरला आहे. पण आता शुभमन गिलच्या नव्या युगाची सुरुवात होत असताना, चाहत्यांमध्ये एकच चर्चा “खरंच संपलं का रोहित शर्मा युग?”