Champions Trophy Final मध्ये विराट 1 रनवर Out झाल्याने 14 वर्षीय मुलीचा Heart Attack ने मृत्यू?

Girl Died Of Heart Attack Is There Virat Kohli Connection: या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 12, 2025, 09:28 AM IST
Champions Trophy Final मध्ये विराट 1 रनवर Out झाल्याने 14 वर्षीय मुलीचा Heart Attack ने मृत्यू?
विराट एक धाव करुन तंबूत परतला

Girl Died Of Heart Attack Is There Virat Kohli Connection: उत्तर प्रदेशमधील देओरिया येथील एका 14 वर्षीय मुलीचं रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असतानाच या मुलीने प्राण सोडले. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार, निधन झालेल्या तरुणीचं नाव प्रियांशी पांड्ये असं आहे. स्थानिक वकील अजय पांड्येंची ती कन्या आहे. प्रियांशी लाखो भारतीयांप्रमाणे रविवारी दुपारी आपल्या कुटुंबियांबरोबर भारत विरुद्ध न्यूझीलंडची फायनल मॅच पाहत होती. त्यावेळीच तिला हृयविकाराचा झटका आला आणि तिची प्राणज्योत मालवली.

आधी काय सांगण्यात आलं?

काही प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यात विराट कोहली एक धाव करुन बाद झाल्याने प्रियांशीला भावना अनावर झाल्या. प्रियांशीला मोठा धक्का बसला आणि चक्कर येऊन ती पडली. त्यातच तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांनाही प्रियांशीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. एवढ्याच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं ऐकून नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. मात्र 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांशीचे वडील आणि शेजाऱ्यांनी तिच्या मृत्यूमागील खरं कारण स्पष्ट केलं आहे. प्रियांशीच्या मृत्यूचा नेमका घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी सांगितलं नक्की घडलं काय

मृत्यूनंतर प्रियांशीच्या कुटुंबियतील इतर सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शेजाऱ्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. तसेच प्रियांशीच्या वडिलांनीही फोनवरुन नक्की काय घडलं हे सांगितलं. अजय पांड्येंनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावातील खेळ संपल्यानंतर ते घरगुती खरेदीसाठी बाजारात गेले. दुसऱ्या डावात खेळ सुरु झाला तेव्हा मुलगी प्रियांशी घरातील सदस्यांबरोबर सामना पाहत होती, असंही अजय पांड्ये म्हणाले. मात्र दुसऱ्या डावाचा खेळ सुरु झाला तरी अजय पांड्ये बाजारातच होते. दुसरीकडे घरी सर्वजण सामना पाहत असतानाच अचानक प्रियांशीला चक्कर आली आणि ती जागेवरच कोसळली. घरातील सदस्यांनी अजय पांड्येंना फोनवरुन याची माहिती दिली. अजय पांड्ये घरी पोहोचल्यानंतर तातडीने प्रियांशीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत प्रियांशीने प्राण सोडले होते.

पोस्टमॉर्टम टाळलं

प्रियांशीच्या वडिलांनी तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला. अजय पांड्येंनी मुलीचा मृतदेह घरी आणला. धार्मिक संस्कार करुन मृतदेहाचं अत्यंसंस्कार करण्यात आले. अजय पांड्ये यांनी आपल्या मुलीचा मृत्यू सामन्यातील ठराविक घडामोडीशी संबंधित असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. सामन्याचा आणि आपल्या मुलीच्या मृत्यूचा थेट कोणताच संबंध नसल्याचं अजय पांड्येचं म्हणणं आहे.

तिला हार्ट अटॅक आला तेव्हा सामन्यातील भारताची स्थिती काय होती?

अजय पांड्येंचे शेजारी अमित चंद्रा यांनी प्रियांशीच्या वडिलांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. प्रियांशीला चक्कर आली तेव्हा आपण तिच्या घराबाहेरच होतो आणि सारं काही आपल्या डोळ्यांसमोरच घडल्याचं अमित चंद्रा म्हणाले. प्रियांशीला हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी सामन्यात भारताची स्थिती उत्तम होती, असंही अमित चंद्रांनी नमूद केलं. प्रियांशी चक्कर येऊन पडली तेव्हा भारताने एकही विकेट गमावली नव्हती आणि विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानातही आला नव्हता. त्यामुळे विराट लवकर बाद झाल्याने प्रियांशीचा मृत्यू झाल्याचा दावा खोटा आहे.