फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला चाबकाचे 99 फटके मारण्याची शिक्षा? चाहतीला Kiss केल्याने राडा?
Cristiano Ronaldo : आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला सार्वजनिक ठिकाणी व्यभिचार केल्याबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. रोनाल्डोने इराणमध्ये पाऊल ठेवल्यास त्याला ही शिक्षा भोगावी लागू शकते, असे म्हटलं जात आहे.
पोर्तगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोला इराणमध्ये (Iran) व्यभिचारप्रकरणी (Adultery) शिक्षा सुनावण्यात आल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोला 99 चाबकाचे फटके (99 lashes) मारण्याची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता याबाबत खुलासा करण्यात आला आहे. खुद्द इराणच्या दूतावासाने याबाबत माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की टॉप फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पुढच्या वेळी इराणला आला तर त्याला 99 चाबकाचे फटके बसू शकतात. कारण त्याचा इराणी चित्रकाराला मिठी मारतानाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. 18-19 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या इराण भेटीदरम्यान हा फोटो घेण्यात आला होता.
इराणच्या भेटीदरम्यान, रोनाल्डोवर पर्शियन कार्पेट्स आणि फुटबॉलपटूच्या पेंटिंगसह चाहत्यांकडून भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये कलाकार फातिमा हमीमी यांनी भेट दिलेली चित्रे होती. 85 टक्के अर्धांगवायू असल्यामुळे फातिमा यांनी ही चित्रे पायाने काढली होती. त्या नेहमी व्हीलचेअरचा वापर करतात.
इराण दौऱ्यादरम्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने इराणी चित्रकार फातिमा हमामी यांना त्याची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली होती. यानंतर त्याने फातिमा यांना मिठी मारली आणि त्यांच्या गालाचे चुंबन घेतले. यावेळी फातिमा यांनी रोनाल्डोला तिच्या पायाने बनवलेल्या दोन कलाकृती दिल्या. रोनाल्डोने केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर टीका केली होती. इराणच्या कायद्यानुसार, हे सगळं गैरवर्तनाचा एक प्रकार मानला जातो.
रोनाल्डोने या सगळ्या प्रकाराबाबत कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं. पण माध्यमांच्या वृत्तानुसार 99 फटक्यांची शिक्षा आधीच जारी केली गेली होती. मात्र, रोनाल्डोने आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप दाखवल्यास त्याची शिक्षा रद्द केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. रोनाल्डोचा संघ एखाद्या स्पर्धेच्या बाद फेरीत इराणी संघाशी सामना करत असल्यास त्याला या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.
इराणच्या दूतावासाने दिलं स्पष्टीकरण
आता स्पेनमधील इराणच्या दूतावासाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी खोटी आहे आणि मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हे केल्याचे इराणच्या दूतावासाने म्हटलं आहे. "आम्ही इराणमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूविरुद्ध न्यायालयाचा कोणताही निर्णय जारी केल्याच्या बातम्या नाकारतो. अशा बनावट बातम्यांचे प्रकाशन हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि अत्याचारित पॅलेस्टिनी राज्याविरुद्ध युद्ध गुन्ह्यांचे प्रमाण असू शकते. हे लक्षात घेतलं पाहिजे की ख्रिस्तियानो रोनाल्डोने फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी इराण दौरा केला होता. तिथे लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले. फातिमा हमामी यांच्यासोबतच्या त्याच्या प्रामाणिक भेटीचे लोक आणि देशाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी कौतुक केले," असे इराणच्या दूतावासाने म्हटलं आहे.
दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध अनेक इराणी वकिलांनी या वर्तनासाठी व्यभिचाराच्या आरोपाखाली खटले दाखल केल्याचे इराणी माध्यमांमध्ये वृत्त होते. इराणमध्ये 'व्यभिचार' संदर्भात कठोर कायदे आहेत आणि इराणच्या कायद्यानुसार, पुरुष नसलेल्या व्यक्तीने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवणे हे व्यभिचाराच्या समान मानले जाते.