IPL 2025 : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयाने त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला असून इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजपूर्वी तो असा निर्णय घेईल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. विराट कोहली यापूर्वीच 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त झाला होता. मात्र टेस्ट आणि टी 20 फॉरमॅटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी पुढील काळात तो भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून भारताचं नाव उंचावलंय, तेव्हा त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला जावा अशी मागणी माजी क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याने केली आहे.
भारत - पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी स्पर्धेतील 58 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळण्यात आला. यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या माजी क्रिकेटर सुरेश रैनाने विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली. सुरेश रैना म्हणाला की, 'विराट कोहलीने त्याच्या करिअरमध्ये जेवढ्या उपलब्धी मिळवल्या आहेत आणि भारत तसेच भारतीय संघासाठी त्याने जे काही योगदान दिलंय त्यासाठी त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे. भारत सरकारने त्याला भारतरत्नहा पुरस्कार द्यायला हवा'.
विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : गौतम गंभीर सोबत 5 तास चर्चा, नवा टेस्ट कर्णधार म्हणून 'या' खेळाडूचं नाव समोर, 23 तारखेला घोषणा?
विराटने निवृत्ती जाहीर करत असताना लिहिले की, 'टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात. शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही - पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे'.