IPL 2025 : भारत - पाकिस्तान तणावामुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 (IPL 2025) ही स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. 3 जून रोजी स्पर्धेचा फायनल सामना पार पडणार असून दरम्यान 13 लीग स्टेज तर 4 प्लेऑफ सामने खेळवले जातील. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चिन्नस्वामी स्टेडियमवर 58 वा सामना पार पडेल. अशातच माजी क्रिकेटर सुरेश रैनाने (Suresh Raina) यंदा आयपीएलच्या 18 व्या सीजनचं विजेतेपद कोणता संघ पटकावले याविषयी भविष्यवाणी केली आहे.
माजी क्रिकेटर सुरेश रैनाने म्हंटले की, 'यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याची पूर्ण शक्यता जास्त आहे. कारण ते यावर्षी खूप वेगळंच खेळतायंत. त्यांनी चिन्नस्वामी स्टेडियमवर 150 आणि 136 सारखी धावसंख्या सुद्धा डिफेंड केली आहे, त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलंय. त्यांच्या नव्या कर्णधाराने चेन्नई सुपरकिंग्सला दोनवेळा हरवले. एकदा चेन्नईमध्ये तर एकदा त्यांच्या होम ग्राउंडवर जे त्यांच्या यावर्षीच्या परफॉर्मन्सबद्दल खूप काही सांगून जाते'.
रैनाने पुढे म्हंटले की, 'ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मकता आहे आणि हे संकेत देतात की यंदा त्यांचा संघ विजेतेपद जिंकू शकतो. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स सुद्धा खूप चांगलं करतायत, पण हे वर्ष विराटचं असू शकतं, जेव्हा तो 18 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी उंचावेल'.
हेही वाचा : रोहित शर्माचा धाकटा भाऊ नेमकं काय करतो? जगण्यासाठी करतोय 'हे' काम, डोंबिवलीशी खास कनेक्शन
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने 12 सामन्यात 510 धावांची कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्या सूर्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर गुजरात टायटन्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने 11 सामन्यात तब्बल 20 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आयपीएल 2025ची पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णाकडे आहे.