टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. दुबळ्या नेपाळने दक्षिण आफ्रिका संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवलं. एका क्षणी नेपाळ हा सामना जिंकेल असं वाटत असतानाच शेवटच्या चेंडूवर चित्र पालटलं आणि दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. नेपाळने सामना गमावल्यानंतर चाहते प्रचंड भावूक झाले होते. अनेक चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दरम्यान या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेन याने आपणही नेपाळ जिंकावं अशी प्रार्थना करत होतो असं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेला तुलनेने दुबळ्या नेपाळने अत्यंत कडवी झुंज दिली. पण अखेरच्या क्षणी नेपाळ संघ अयशस्वी झाला आणि इतिहास रचता रचता राहिला. अनेक क्रिकेटचाहतेही नेपाळ संघाची कामगिरी पाहून तेच जिंकण्यास पात्र होते अशी भावना व्यक्त केली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेनही आहे. हा स्पर्धेतील सर्वोत्तम सामना होता असं डेल स्टेनने सांगितलं आहे.


सामन्यानंतर डेल स्टेनने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, "हा अत्यंत जबरदस्त सामना होता. मला वाटतं स्पर्धेतील सर्वोत्तम सामना होता. मी अंडरडॉग संघांचा फार मोठा चाहता आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा असूनही मी नेपाळला पाठिंबा देत होतो. तुम्ही करु शकता असं मी म्हणत होतो".


जर नेपाळने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला असता तर हा वर्ल्डकपमधील सर्वोत्तम क्षण ठरला असता असंही डेल स्टेनने सांगितलं. "तोंडात बोटं घालून पाहिला जाणारा हा सामना, स्टँडमध्ये लोक रडत होते. यावरुन लोकांसाठी हा सामना किती महत्वाचा होता हे दिसत आहे. हेच खरं क्रिकेट आहे, 200 धावा वैगेरे नाही. यासाठीच खरा खेळ आहे. जर नेपाळ जिंकला असता तर चर्चेचा विषय ठरला असता. जर नेपाळने सामना जिंकला असता तर त्यांचीच चर्चा झाली असती. हे झालं असतं तर मजा आली असती. ते जिंकण्यास पात्र होते," असं डेल स्टेन म्हणाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


नेपाळला विजयासाठी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावत नेपाळसमोर 115 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण किशोर गुलसन अंतिम चेंडूवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने हा रोमांचक सामना जिंकला. या पराभवानंतर नेपाळचे खेळाडू निराश झाले होते. 24 चेंडूत 22 धावांची गरज असताना नेपाळ आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय नोंदवेल असं वाटत होतं. त्यांना 18 चेंडूंत 18 धावांची गरज होती पण सहा चेंडूंत एका धावेवर तीन विकेट गमावल्या, त्यात फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या दोन विकेट्सचा समावेश होता. यानंतर सामन्याचं समीकरण बदललं.


शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर ओटनील बार्टमनने टाकलेल्या गुलशनला धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर त्याने ऑफ साइडमधून एक चौकार मारला आणि नेपाळला 3 चेंडूत 4 धावा हव्या होत्या. नंतर नेपाळला 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. पाचवा चेंडू डॉट बॉल होता. यानंर एकही धाव झाली नाही आणि पुढच्याच चेंडूवर गुलशन धावबाद झाला. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल याने आम्ही फार जवळ असूनही दूर होतो अशा भावना व्यक्त केल्या. 


“मला वाटतं संकटाच्या क्षणी आम्ही चांगली कामगिरी केली आणि आम्ही ज्या प्रकारे लढलो ते खूप चांगले होते. जर आम्ही अव्वल संघांशी अधिक नियमितपणे खेळू शकलो तर पुढच्या वेळी आम्ही विजयी बाजूने असू”, असंही तो म्हणाला.