राष्ट्रगीतावेळी उभे न राहणाऱ्यांवर गंभीरचा निशाणा
चित्रपट गृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरून सध्या वाद सुरू आहे.
नवी दिल्ली : चित्रपट गृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरून सध्या वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे हा वाद आणखी उफाळून आला आहे. काही जण चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचं समर्थन करतायत तर काही जण याचा विरोध करत आहेत. देशभक्ती दाखवणं बंधनकारक असू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेता कमल हसननं दिली आहे.
राष्ट्रगीताच्या या वादामध्ये क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही उडी मारली आहे. राष्ट्रगीतावेळी उभे न राहणाऱ्यांवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. क्लब बाहेर २० मिनीटं थांबू शकता. हॉटेलबाहेर ३० मिनिटं थांबू शकता पण राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभं राहणं कठीण वाटतं, असं ट्विट गौतम गंभीरनं केलं आहे.
देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीतावेळी उभं राहणं गरजेचं नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याच्या नियमांमध्ये संशोधन करायलाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे.