हार्दिक पांड्यानं मागितली ईशान किशनची माफी
बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४६ रन्सनं विजय झाला.
मुंबई : बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४६ रन्सनं विजय झाला. यंदाच्या आयपीएलमधला मुंबईचा हा पहिलाच विजय होता. पण या मॅचमध्ये मुंबईचा विकेट कीपर ईशान किशनला दुखापत झाली. यानंतर हार्दिक पांड्यानं ईशान किशनची माफी मागितली आहे. ट्विटरवरून हार्दिक पांड्यानं ईशान किशनबरोबरचा फोटो शेअर केला आहे. माझा क्यूट पाय, सॉरी भावा, कणखर राहा, असं ट्विट हार्दिकनं केलं आहे.
हार्दिकचा थ्रो ईशानला लागला
मुंबई आणि बंगळूरु यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा विकेटकीपर फलंदाज ईशान किशन दुखापतग्रस्त झाला. जसप्रीत बुमराहच्या डावातील १३व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीने शॉट लगावला. हा शॉट मिड विकेटवर हार्दिक पांड्याने पकडला. जसा पांड्याने हा चेंडू थ्रो केला तेव्हा हा चेंडू ईशानच्या तोंडावर लागला.
ईशानने त्यावेळी हेल्मेट घातले नव्हते. यामुळे तो चेंडू जोरात येऊन चेहऱ्यावर आदळला. हा फटका इतका मोठा होता की इशान खालीच कोसळला. मैदानावर तात्काळ फिजिओला बोलावण्यात आले. ईशान कोसळल्याचे पाहून भितीने मुंबईच्या प्लेयर्सनी इशानकडे धाव घेतली. इशानच्या डाव्या डोळ्याला जखम झाली नव्हती. ईशानचं नशीब बलवत्तर म्हणून त्याचा डोळा थोडक्यात वाचला.