`बेटी बचाओ` पासून आम्ही `बलात्कारी बचाओ` झालोत का?
उत्तर प्रदेशचं उन्नाव आणि जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचं उन्नाव आणि जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून क्रिकेटपटूंनी या घटनेचा निषेध केला आहे. सोनम कपूर आणि सानिया मिर्झा यांनीही या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली. भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य केलं आहे. उन्नाव आणि कठुआ गँगरेपच्या घटना भारताच्या चेतनेवर बलात्कार आहे. भारताची सिस्टिम खराब झाली आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये त्याची हत्या होत आहे. जर हिंमत असेल तर अपराध्यांना पकडून दाखवा, असं गंभीर म्हणालाय.
कठुआमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या मुलीचा खटला दीपिका सिंग राजावत लढत आहे. दीपिका यांचंही गंभीरनं समर्थन केलं आहे. दीपिकाला विरोध करणाऱ्या वकिलांची मला लाज वाटते. बेटी बचाओवरून आम्ही बलात्कारी बचाओ झालोत का, असा सवाल गंभीरनं विचारला आहे.
कठुआ प्रकरणात संतापाची लाट
कठुआमध्ये अल्पवयीन मुलीला मंदिरात डांबून ठेवण्यात आलं होतं. मंदिरामध्ये तिला अंमली पदार्थही देण्यात आले. तसंच हत्या करण्याआधी तिच्यावर आठवडाभर अनेकवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीवर बलात्कार करण्यासाठी मेरठहून आरोपीला बोलवण्यात आलं होतं. वासना मिटवण्यासाठी ये असं सांगून त्याला कठुआला बोलवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे एका पोलिसानंही मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला. हत्येपूर्वी या मुलीचं डोकं दगडावर आपटण्यात आलं.
उन्नावमध्ये भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप
उन्नाव गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटीला ताबडतोब रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. मात्र या प्रकरणात आता पीडित मुलीच्या वडिलांचा पोलीस स्टेशनमध्ये झालेला संसयास्पद मृत्यू आता नवा खुलासा करत आहे. झी मीडियाला मिळालेल्या 3 एप्रिलचा एक व्हिडिओमध्ये यूपी पोलीस जखमी अवस्थेतील बेशुद्ध पीडितेच्या वडिलांचा अंगठा काही कागदपत्रांवर लावून घेत आहेत. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर ज्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे तिच्या वडिलांचा आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे.
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडीओत दिसत असलेली व्यक्ती पीडित तरुणीचे वडिल असल्याचं सांगितलं जात असून, ते स्ट्रेचरवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसत आहेत. तीन लोक त्याच्याजवळ उभे असलेले दिसत आहे. यापैकी एक पोलीस आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, त्या व्यक्तीच्या पायातून रक्त निघत असून तो बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. यावेळी त्याची मदत करायचं सोडून जवळ उभे असणारे दोघेजण कागदावर त्याचा अंगठा घेत आहेत. हे सर्व खूप घाईत केलं जात असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
काय आहे प्रकरण ?
या अगोदर याच प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ आता समोर आल होता. या व्हिडिओत पीडितेचे वडील गंभीर जखमी अवस्थेत दिसत होते. हा व्हिडिओ ३ एप्रिल रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ एका रुग्णालयातील आहे. यात पीडितेच्या वडिलांसोबत दोन पोलीसही दिसत आहे.