मेलबर्न : शेन वॉर्न आणि रिकी पाँटिंग या दोघांनी ऑस्ट्रेलियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. पण आता शेन वॉर्ननं केलेल्या एका वक्तव्यामुळे रिकी पाँटिंगची नोकरी धोक्यात आली आहे. रिकी पाँटिंग हा आता ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. याचबरोबर पाँटिंगकडे आयपीएलच्या दिल्ली टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक असणे हे परस्पर हितसंबध नाहीत का? असा सवाल शेन वॉर्ननं उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परस्पर हितसंबधांबद्दलच्या बीसीसीआयच्या भूमिकेमुळे भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना किंवा एखाद्या टीमचे प्रशिक्षक म्हणून दिसत नाहीत. बीसीसीआयच्या २०१५ सालच्या या नव्या नियमांमुळे रवी शास्त्रींना आयपीएलचं गव्हर्निंग काऊन्सिलमधलं पद सोडावं लागलं होतं. तसंच परस्पर हितसंबंधांमुळे भारतीय टीमचा कोणताही प्रशिक्षक किंवा सहाय्यक प्रशिक्षक आयपीएल टीमचा प्रशिक्षक होऊ शकत नाही.


मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेन वॉर्न म्हणाला, 'जर भारतीय प्रशिक्षकांना हा न्याय लावण्यात येत असेल, तर पाँटिंगला दुसरा न्याय का? पाँटिंगचं दिल्लीचं प्रशिक्षक असण्यात मला काहीच आक्षेप नाही. दिल्लीच्या टीममध्ये तो ज्यांना प्रशिक्षण देईल, वर्ल्ड कपमध्ये तो त्यांच्याविरुद्ध असेल. पण भारतीय प्रशिक्षकांच्या दृष्टीनं तुम्ही बघाल तर, पाँटिंगचं दिल्लीला प्रशिक्षण करणं चूक आहे. याबद्दल बीसीसीआयला निर्णय घ्यायचा आहे, पण जर रवी शास्त्रीला आयपीएलचा प्रशिक्षक होता येत नसेल, तर मग रिकी पाँटिंगलाही प्रशिक्षक बनवता कामा नये.'