'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'

Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 13, 2025, 10:25 AM IST
'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'
घरासमोरील राड्याबद्दल केलं भाष्य

Yuvraj Singh father On Kapil Dev: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगीराज सिंग भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला कर्णधार असलेल्या कपील देवने संघातून वगळल्याने याला ठार करण्याचा विचार मनात आला होता, असं योगीराज सिंग यांनी म्हटलं आहे. त्यावेळी नेमकं काय काय घडलं होतं याचा सविस्तर तपशील योगीराज सिंग यांनी सांगितला आहे. भारतीय संघ 1980-81 साली झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये योगीराज सिंग हे भारतीय संघाचा भाग होते. त्यावेळेस ते एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने या दौऱ्यात खेळले होते. त्यांना संघातून वगळण्यात आल्यानंतर झालेल्या राड्याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

माझ्या पत्नीचं म्हणणं होतं की मी...

"कपिल देव भारताचा तसेच नॉर्थ झोन आणि हरिणाया संघाचा कर्णधार झाला तेव्हा त्याने माझं नाव काहीही कारण नसताना वगळलं होतं," अशी आठवण योगीराज सिंग यांनी सांगितली. त्यांनी 'अनफिल्टर्ड बाय समधीश' या शोमध्ये दिलेल्या विशेष मुलाखत दिली आहे. त्यातच त्यांनी हा खुलासा केला आहे. "मी कपिल देवला याबद्दल प्रश्न विचारावेत असं माझ्या पत्नीचं (युवराजच्या आईचं) म्हणणं होतं. मात्र मी या माणसाला जन्माची अद्दल घडवणार आहे, असं तिला सांगितलं होतं," अशी माहिती योगीराज सिंग यांनी दिली.

पिस्तुल काढलं अन् त्याचा घर गाठलं

"मी माझं पिस्तुल काढलं आणि थेट कपिल देवचं सेक्टर 9 मधील घर गाठलं. तो त्याच्या आईबरोबरच घराबाहेर आला. मी त्याला अनेक शिव्या घातल्या. तुझ्यामुळे मी माझा एक चांगला मित्र गमावला, असंही त्यावेळेस मी त्याला म्हणालो. तू जे काही केलं आहे ते तुला फेडावं लागणार आहे," असं मी कपिल देवला म्हणालो होतो, अशी आठवण योगीराज सिंग यांनी सांगितलं. पुढे बोलताना, "मी त्याला म्हणालो की, "मला तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे. मात्र इथे उभ्या असलेल्या तुझ्या आईकडे पाहून मी असं काही करत नाहीये." इतकं बोलून मी 'शबनम' चल इथून, म्हणत निघालो," अशी माहिती योगीराज सिंग यांनी दिली.  

नक्की वाचा >> 'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'

...तेव्हापासून ठरवलं आपल्याऐवजी युवराज खेळणार

"त्या क्षणापासून मी ठरवलं की यापुढे मी क्रिकेट खेळणार नाही. माझ्याऐवजी युवराज क्रिकेट खेळेल असं ठरवण्याचा हाच तो क्षण होता," असं योगीराज सिंग म्हणाले.

मी बिशन सिंग बेदीला कधीच माफ करणार नाही कारण...

दिवंगत क्रिकेटपटू आणि एकेकाळचे सहकारी बिशन सिंग बेदी यांच्यावरही योगीराज सिंग यांनी गंभीर आरोप केले. "त्या माणसाने माझ्याविरुद्ध कट केला. मी बिशन सिंग बेदीला कधीच माफ करणार नाही," असं योगीराज सिंग म्हणाले. "मला संघातून वगळण्यात आल्यानंतर मी निवड समितीमधील रविंद्र चड्डा यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांनी बिशन सिंग बेदींनी (त्यावेळे ते निवड समितीचे अध्यक्ष होते) योगीराज सिंग संघात नको अशी भूमिका घेतली होती. कारण त्यांना मी सुनिल गावसकरांच्या टोळीतील खेळाडू वाटत होतो. यामागील कारणं असं होतं की मी मुंबईतून खेळायचो आणि मी गावसकरांचा निकटवर्तीय होतो," असं योगीराज सिंग म्हणाले.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More