ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात नंबर 1, जयस्वालनेही घेतली गरुड झेप तर कोहलीचाही धमाका

भारताने पर्थ टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला यात टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहने महत्वाची भूमिका बजावली, या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा मिळाला. 

पुजा पवार | Updated: Nov 27, 2024, 04:41 PM IST
ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात नंबर 1, जयस्वालनेही घेतली गरुड झेप तर कोहलीचाही धमाका  title=
(Photo Credit : Social Media)

ICC Test Ranking : आयसीसीने टेस्ट क्रिकेटमधील लेटेस्ट रँकिंग (ICC Test Ranking) जाहीर केली असून यात भारताचा डंका वाजला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)याने पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत नंबर 1 चं स्थान पटकावलं आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराहने तब्बल 8 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने पर्थ टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला यात टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहने महत्वाची भूमिका बजावली, या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा मिळाला. 

गोलंदाजीमध्ये बुमराह नंबर 1 वर :  

आयसीसी गोलंदाजांच्या टेस्ट रँकिंगमध्ये बुमराह 883 रेटिंगने नंबर 1 वर आहे. तर साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज रबाडा हा 872 रेटिंगने नंबर 2 वर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलहूड 3, भारताचा फिरकीपटू आर अश्विन नंबर 4 तर श्रीलंकेचा गोलंदाज जयसूर्या हा 801 रेटिंगने 5 व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी देखील बुमराह हा फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट सामन्यादरम्यान टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 चा गोलंदाज ठरला होता. आता पुन्हा एकदा वर्षाच्या अंती बुमराहने हे स्थान काबीज केलं आहे. 

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये जयस्वालची झेप : 

भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने देखील टेस्ट रँकिंगमध्ये झेप घेतली आहे. जयस्वाल फलंदाजांच्या टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 2 वर पोहोचला आहे. यशस्वी जयस्वालने पर्थ टेस्ट सामन्यात 161 धावांची खेळी केली. यानंतर जयस्वालने आपल्या करिअरमधील 825 ही सर्वश्रेष्ठ टेस्ट रेटिंग  मिळवली. यशस्वीच्या वरती इंग्लंडचा फलंदाज जो रूट आहे, त्याची रँकिंग 903 अशी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर हॅरी ब्रूक तर पाचव्या क्रमांकावर डॅरिल मिशेल आहे. तर सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने देखील पर्थ टेस्टमध्ये शतक झळकावल्यामुळे त्याने थेट 13 व्या स्थानावर उडी घेतली आहे. 

 

बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी