Champions Trophy: 'तुम्हाला जर साधा प्रोटोकॉल...', समारोप सोहळ्यात अपमान झाला म्हणणाऱ्या PCB ला ICC चं सणसणीत उत्तर

दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोप समारंभात झालेल्या कथित दुर्लक्षाबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आयसीसीकडून कोणतंही औपचारिक स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता कमी आहे.  

शिवराज यादव | Updated: Mar 12, 2025, 10:43 AM IST
Champions Trophy: 'तुम्हाला जर साधा प्रोटोकॉल...', समारोप सोहळ्यात अपमान झाला म्हणणाऱ्या PCB ला ICC चं सणसणीत उत्तर

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान असतानाही दुबईत समारोप समारंभात आपल्याला दुर्लक्षित करण्यात आलं असा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून केला जात आहे. दरम्यान या कथित दुर्लक्षाबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आयसीसीकडून कोणतंही औपचारिक स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता कमी आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने 4 गडी राखत न्यूझीलंडचा पराभव करत स्पर्धा जिंकली. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्पर्धा संचालक सुमेर अहमद यांना अंतिम सादरीकरणासाठी मंचावर आमंत्रित न केल्याने वाद निर्माण झाला. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने "आम्ही आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. कारण जे घडले ते आम्हाला अस्वीकार्य आहे," असं सांगितलं आहे. 

दरम्यान आयसीसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीला कोणतंही औपचारिक स्पष्टीकरण दिलं जाणार नाही. "जर पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर पाहिले तर आयसीसीचे सीईओ जेफ अलार्डिस देखील स्टेजवर उपस्थित नव्हते. कारण तसा प्रोटोकॉल आहे," असं आयसीसीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

'उद्या भारताने नो बॉल, वाईड नको सांगितलं तर त्यालाही....,' वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू संतापला, 'ICC ने त्यांना आता....'

"सुमैर अहमद हे पीसीबीचे कर्मचारी आहेत, अधिकारी नाहीत. स्पर्धा संचालक सादरीकरणासाठी कधी स्टेजवर आले आहेत? हेदेखील आपण तपासून पाहावं. याचं एक उदाहरणही देऊ शकतो. आयसीसीचे नवे ऑपरेशन्स आणि कम्युनिकेशन्स प्रमुख गौरव सक्सेना हे एकेकाळी दुबईतील आशिया कपसाठी टूर्नामेंट डायरेक्टर होते. ते अंतिम सादरीकरणासाठी स्टेजवर होते का?," अशी आठवण आयसीसीच्या सूत्रांनी करुन दिली आहे. 

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी मंचावर उपस्थित होते. त्यांनी भारतीय खेळाडूंना पांढरे ब्लेजर आणि मॅच अधिकाऱ्यांना मेडल्स प्रदान केली. तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी कर्णधार रोहित शर्माच्या हाती ट्रॉफी सोपवली आणि खेळाडूंना मेडल्स दिले. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ रॉजर टूसे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. सैकिया आयसीसी बोर्डावर बीसीसीआय संचालक आहेत आणि बिन्नी हे पर्यायी संचालक आहेत.

'संजना, अजिबात मजा आली नाही,' के एल राहुलने बुमराहच्या पत्नीला स्पष्टच सांगितलं, 'मला 200 वेळा...'

"समारोप समारंभात मंचावर आमचे सीओओ आणि स्पर्धा संचालक स्टेजवर नसल्याची कारणं आम्हाला काही पटत नाहीत. आम्ही औपचारिक स्पष्टीकरण किंवा माफीची वाट पाहत आहोत," असं पीसीबीच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. "यजमान देश म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेकडे केलेल्या या उघड दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे," असं अधिकाऱ्याने सांगितलं.

"आयसीसी फक्त सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सचिवांनाच समारंभासाठी आमंत्रित करते असे स्पष्टीकरण देणं न पटणार आहे. आम्हाला सार्वजनिक स्पष्टीकरण हवं आहे आणि अशी पक्षपाती आणि अन्याय्य वागणूक पुन्हा होणार नाही याची हमी हवी आहे अन्यथा आम्ही हे प्रकरण प्रशासक मंडळाकडे ढकलू," असा इशारा पीसीबीने दिला आहे.