India vs Pakistan : महिला वर्ल्ड कप सामन्यात हवालदाराच्या मुलीने मारली बाजी, कोण आहे पाकिस्तानला धुळ चारणारी क्रांती गौड?

ICC Women World Cup IND Vs PAK :  महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 88 धावांनी दणदणीत विजय! क्रांती गौड ठरली 'प्लेअर ऑफ द मॅच'

Updated: Oct 6, 2025, 02:08 PM IST
India vs Pakistan : महिला वर्ल्ड कप सामन्यात हवालदाराच्या मुलीने मारली बाजी, कोण आहे पाकिस्तानला धुळ चारणारी क्रांती गौड?

ICC Women World Cup IND Vs PAK :  महिलांच्या क्रिकेट वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धचा विक्रम आता 12-0 असा झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अशा या सामन्यात भारताने दिलेल्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम 159 धावांवर गारद झाली. भारताकडून क्रांती गौडने अफलातून गोलंदाजी करत पाकिस्तानचा कणा मोडला. तिने 10 षटकांत फक्त 20 धावा देत 3 खेळाडूंना तंबूत माघारी धाडलं आणि याच कामगिरीसाठी तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

Add Zee News as a Preferred Source

संघर्षातून यशाकडे निघालेली एक 'क्रांती'

क्रांती गौड मध्य प्रदेशातील छोट्याशा गावात, छतरपूरजवळील घुवारा येथे राहत असून, तिचे वडील निवृत्त पोलीस कॉन्स्टेबल आहेत. अनेक अडचणींमधून त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. सहा भावंडांपैकी एक असणाऱ्या क्रांतीनं तिच्या बालपणात अनेक आर्थिक आणि सामाजिक अडथळ्यांचा सामना केला. काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांना नोकरीतून निलंबित करण्यात आल. मात्र या संकटानं न खचता त्यावर मात करत क्रांतीने स्वतःचे स्वप्न साकार केले.

क्रांतीचे पहिले ट्रेनर राजीव बिलथरे असून, राजीव हे छतरपूर जिल्हा क्रिकेट संघाचे सचिव आहेत. त्यांनी क्रांतीच्या या प्रवासाविषयी सांगताना म्हटलं, “क्रांती 2017 पासून माझ्याकडे प्रशिक्षण घेत आहे. तिचे वडील एकदा तिला माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणाले ती गावातील मुलींसोबत क्रिकेट खेळते, तुम्ही तिला प्रशिक्षण देऊ शकता का? एका सराव सामन्यात तिची गोलंदाजी पाहून मी प्रभावित झालो आणि तिला छतरपूरमधील माझ्या अकॅडमीमध्ये दाखल होण्यास सांगितले.''

मध्य प्रदेश संघासाठी मोलाची कामगिरी

क्रांतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचा अचूक लक्ष्यभेद. विरोधी संघातील खेळाडूपल्याड थेट स्टम्पवर तिची भेदक नदर खिळलेली असते. तिने आतापर्यंत मध्य प्रदेशकडून सर्व वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मागील एका सामन्यात तिने मध्य प्रदेशला 'नॅशनल वुमेन्स चॅम्पियनशिप' जिंकवून दिली. अंतिम सामन्यात बंगालविरुद्ध तिने सलग 4 विकेट घेतले होते, त्यात भारतीय विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोषचाही समावेश होता. ती गोलंदाजीसमवेत एक उत्तम फलंदाज आहे आणि तिच्या याच शिस्तीमुळे संघात तिचं वेगळेपण सिद्ध होत आहे. 

चंद्रकांत पंडित यांचे मार्गदर्शन 

क्रांतीच्या प्रगतीमध्ये माजी भारतीय विकेटकीपर आणि दिग्गज प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी एमपीसीए (मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन) च्या कॅम्पमध्ये क्रांतीला प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीने फक्त एका वर्षात स्वतःच्या गोलंदाजीमध्ये मोठी सुधारणा केली. पंडित हे त्या वेळी मध्य प्रदेश आणि कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक होते.

क्रांतीची  प्रेरणादायी कहाणी

छोट्या गावातून येऊन राष्ट्रीय पातळीवर झळकणारी क्रांती गौड आज अनेक तरुणींसाठी आदर्श  ठरली आहे. तिचा प्रवास सिद्ध करतो की “संघर्ष कितीही मोठा असो, मेहनत आणि चिकाटी असेल तर स्वप्नं नक्कीच पूर्ण होतात.”

About the Author