मुंबई : क्रिकेट हा फक्त खेळ नाही, ही एक भावना आणि जगण्याची नवी उमेद आहे, या वाक्याला भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज शिखर धवन याने स्पष्ट केलं आहे. इंग्लंडमध्ये सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवातीची मदार ही धवनवर होती. पण, हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे मात्र त्याला काही दिवस संघापासून दूर राहावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या अशा स्पर्धेच्याच वेळी हे संकट ओढावणं हे एखाद्या खेळाडूला खचवणारं असतं. पण, भारताच्या क्रिकेट संघातील हा गब्बर मात्र या संकटांवर मात करण्यासाठीच जणू सज्ज आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेली कविता पाहून याचाच अंदाज येत आहे. 


बॉलिवूड गीतकार आणि प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदौरी यांच्या काव्याच्या काही ओळी त्याने पोस्ट केल्या आहेत. यशाचा आणि उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या कामगिरीचा, खऱ्या आणि मेहनतीच्या प्रयत्नांना कधीच अपयश येत नाही; कारण यामध्ये अपार आत्मविश्वासाठी जोड असते, अशा आशयाच्या या ओळी शिखरने पोस्ट केल्या आहेत. 


आव्हानाच्या प्रसंगातही आत्मविश्वास डगमगू न देता या परिस्थितीत पाय घट्ट रोवून हा 'गब्बर' संकटांचा सामना करत आहे, हेच प्रतित होत आहे. शिखरचा हा अंदाज पाहता मैदानापासून दूर असला तरीही, मनाने मात्र शिखर क्रिकेटच्याच खेळपट्टीवर आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



दरम्यान, शिखरची दुखापत पाहता किमान पुढील दोन सामन्यांना तो मुकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला शिखरवर उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तुर्तास त्याच्या ऐवजी चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी ऋषभ पंतच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात होणाऱ्या या प्रत्येक लहानमोठ्या बदलांकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचं लक्ष लागलेलं आहे.