Virat Kohli 48th Century : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशवर (Team India beat Bangladesh) सात विकेटने मात करत सलग चौथ्या विजयाची नोंद केलीय. या विजयाचा हिरो ठरला तो स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli). विराट कोहलीने षटकार लगावत टीम इंडियाच्या विजयाचा चौकार लगावला. विराटने 103 धावांची नाबाद खेळी केली. या शतकाबरोबरच विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे 48 वं शतक (Virat Kohli 48th Century) ठरलं आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकाच्या विक्रमापासून विराट केवळ एक पाऊल दूर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांचा विक्रम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीची 'विराट' खेळी
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 103 धावांची नाबाद खेळी केली. अवघ्या 97 चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यात त्याने 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. विराटच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 41 व्या षटकातं विजयाचं आव्हान पार केलं.  या शानदार खेळीमुळे विराट प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. यंदाच्या विश्वचषकात चार सामन्यात विराटच्या नावावर दोन अर्धशतकं आणि एक शतकाची नोंद झाली असून त्याने 259 धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84, अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 55 आणि पाकिस्तानविरुद्ध 16 धावा केल्यात. 


आठ वर्षांचा दुष्काळ संपवला
बांगलादेशविरुद्धच्या शतकाबरोबरच विराट कोहलीने विश्वचषकातील आठ वर्षांचा दुष्काळही संपवला आहे. 4 विश्वचषक स्पर्धेत विराटचं हे तिसरं शतक ठरलं आहे. यातली दोन शतकं त्याने बांगलादेशविरुद्ध लगावली आहेत. 


सचिनच्या विक्रमापासून एक पाऊल दूर
विराट आता शतकांच्या अर्धशतकापासून दोन पावलं तर सचिन तेंडुलरच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमापासून दोन पावलं दूर आहे. सचिनने 463 एकदिवसीय सामन्यात 49 शतकं आणि 96 अर्धशतकं नोंदवली आहेत. तर विराटने अवघ्या 285 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 48 शतकं ठोकली आहेत. विराट कोहलीने आणखी एक विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 26 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल बनला आहे. विराट कोहलने 577 इनिंगमध्ये हा विक्रम केला आहे. तर सचिन तेंडुलकरने 601 इनिंगमध्ये 26 हजार धावा केल्या होत्या. 


याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीच्या नावावर 111 कसोटीत  8676 धावा, एकदिवसीय सामन्यात 13342 धावा आणि 115 टी20 सामन्यात  4008 धावा केल्या आहेत. विराटने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने  (25957 रन) ला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (34257) आहे.