बांगलादेशात चाहत्यांनी क्रिकेटर्सच्या गाड्या फोडल्या, विमानतळाबाहेर केली दगडफेक; नेमकं काय घडलंय?

Afg vs ban: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी बांगलादेशी संघ विमानतळावर येताच चाहत्यांनी खेळाडूंवर हल्ला केला.

Updated: Oct 17, 2025, 11:33 AM IST
बांगलादेशात चाहत्यांनी क्रिकेटर्सच्या गाड्या फोडल्या, विमानतळाबाहेर केली दगडफेक; नेमकं काय घडलंय?

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 200 धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह अफगाण संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकून एकतर्फी वर्चस्व गाजवलं. मंगळवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 293 धावांचा डोंगर उभारला होता. दरम्यान बांगलादेशचा संघ फक्त 93 धावांवर गारद झाला. 

Add Zee News as a Preferred Source

बिलाल सामीची धडाकेबाज खेळी
फक्त दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या बिलाल सामीने 7.1 षटकांत फक्त 33 धावांत 5 विकेट्स घेत बांगलादेशी फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. या अफलातून कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. बांग्लादेशच्या मेहदी हसन मिराजच्या नेतृत्वाखालील संघाला संपूर्ण मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही, त्यामुळे चाहत्यांचा राग अनावर झाला.

एअरपोर्टवरच घडला धक्कादायक प्रसंग
अहवालानुसार, संघ बांगलादेशात परतल्यावर एअरपोर्टवर चाहत्यांनी घोषणाबाजी केली. इतकंच नव्हे तर खेळाडूंच्या गाड्यांवर दगडफेक आणि हल्ले झाल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे संघातील खेळाडू हादरले.

मोहम्मद नईम शेखची भावनिक पोस्ट
या घटनेनंतर बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद नईम शेख भावनिक झाला. त्याने सोशल मीडियावर लिहिलं, “जिंकणे-हरणे हा खेळाचा भाग आहे. पण आमच्या गाड्यांवर हल्ला करणं योग्य नाही. आम्ही देशाचं नाव घेऊन मैदानात उतरतो. कधी यश मिळतं, कधी नाही, पण प्रयत्न नेहमी देशासाठीच करत असतो. आम्हाला प्रेम हवं, द्वेष नाही. टीका चालेल, पण हिंसा नाही. हा झेंडा आमचा अभिमान आहे, आणि आम्ही पुन्हा उभे राहू.”

अफगाणिस्तानचा हा विजय त्यांच्या वनडे इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. त्यांनी याआधी टी20 मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेत बांगलादेशवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या मालिकेनंतर अफगाण संघाचं मनोबल प्रचंड वाढलं असून, बांगलादेशच्या चाहत्यांमध्ये मात्र निराशेची लाट उसळली आहे.

FAQ

1. सामनावीर कोण ठरला आणि त्याने काय कामगिरी केली?

बिलाल सामी सामनावीर ठरला. त्याने दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ७.१ षटकांत ३३ धावांत ५ विकेट्स घेतल्या.

2. बांगलादेशी चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

संघ परतल्यावर एअरपोर्टवर चाहत्यांनी घोषणाबाजी केली, खेळाडूंच्या गाड्यांवर दगडफेक आणि हल्ले केले.

3. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध किती धावांनी विजय मिळवला?

अफगाणिस्तानने तिसऱ्या वनडे सामन्यात २०० धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-० ने जिंकली

About the Author