)
IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. दिल्ली मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर 7 विकेटने विजय मिळवला आहे. यापूर्वी देखील टीम इंडियाने अहमदाबाद येथे झालेला पहिला टेस्ट सामना जिंकला होता. ज्यामुळे भारताने सीरिज 2-0 ने जिंकली. मात्र सीरिज जिंकल्यावर सुद्धा टीम इंडियाचा (Team India) हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) नाराज दिसला. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत ही नाराजी व्यक्त करत एक मागणी केली.
टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या मते, दिल्लीच्या पिचने वेगवान गोलंदाज आणि फिंगर स्पिनर्सना फारशी मदत केली नाही. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. अरुण जेटली स्टेडियमची पिच ही स्पिनर्ससाठी उपयुक्त आहे परंतु रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना त्यातून कोणतीही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत, गंभीरने सामना जिंकल्यावर पिचचा वेग आणि उसळीच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि अशी पिच मिळणं निराशाजनक होतं असे देखील म्हटले.
हेड कोच गौतम गंभीरने सामन्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, 'मला वाटतं की आम्हाला इथे चांगली पिच मिळू शकली असती. पाचव्या दिवशी आम्हाला निकाल मिळाला, पण मला वाटतं चेंडू कडेला जाऊन विकेटकिपर किंवा स्लिप फील्डर्सपर्यंत पोहोचायला हवा होता. मला माहित आहे की आपण फिरकी गोलंदाजांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल बोलत राहतो, पण जेव्हा तुमच्याकडे दोन उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असतात, तेव्हा तुम्हाला असे वाटते की त्यांनी सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे.
पुढे कोच गंभीर म्हणाला की, 'खेळपट्टीवर थोडा वेग आणि उसळी असायला हवी होती, पण इथे तसं काहीच नव्हतं, जे आमच्यासाठी निराशाजनक आहे. भविष्यात आपण चांगल्या पिचचा वापर करू शकतो कारण टेस्ट क्रिकेट टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे'.
दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने शतक लगावले. भारतीय संघाने टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली होती. त्यानंतर तर वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 248 धावांवर आटोपली. वेस्ट इंडिजच्या संघाने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळला यात त्यांनी भारताच्या धावा पूर्ण करून अतिरिक्त 121 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा टेस्ट सामना जिंकण्यासाठी 121 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान टीम इंडियाने पाचव्या दिवशी 7 विकेट राखून पूर्ण केलं.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सिरीज कशी जिंकली?
उत्तर: भारताने दोन सामन्यांची टेस्ट सिरीज २-० ने जिंकली. पहिला सामना अहमदाबाद येथे आणि दुसरा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर जिंकला गेला. दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेटने विजय मिळवला.
गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत काय मागणी केली?
उत्तर: गंभीरने चांगल्या पिचची मागणी केली. त्यांनी म्हटले की, पिचवर वेग आणि उसळी असावी, जेणेकरून चेंडू कडेला जाऊन विकेटकीपर किंवा स्लिप फील्डर्सपर्यंत पोहोचेल. भविष्यात अशा पिचचा वापर करावा, जेणेकरून टेस्ट क्रिकेट टिकेल.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची पिच कशी होती?
उत्तर: ही पिच स्पिनर्ससाठी उपयुक्त असते, पण या सामन्यात ती सपाट होती. वेगवान गोलंदाज आणि फिंगर स्पिनर्सना विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागला, कारण पिचमध्ये वेग आणि उसळीचा अभाव होता.