)
India Women vs Pakistan Women Match: महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये (ICC Women's World Cup) सर्वात जास्त चर्चेत असलेला सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान महिला संघातील भिडंत. रविवार, 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. पण, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच या रोमांचक लढतीवर संकटाचे ढग दाटले होते.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहतो. काही आठवड्यांपूर्वी पुरुषांच्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर तीन वेळा विजय मिळवला आणि तिन्ही सामन्यांभोवती वादही निर्माण झाले. आता महिला वर्ल्ड कपमध्ये दोन्ही देश पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत, पण यावेळी संकट वेगळं आहे पावसाचं!
शनिवारी, म्हणजेच भारत-पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी, त्याच मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना नियोजित होता. मात्र दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला. टॉसही होऊ शकला नाही. आता जेव्हा रविवारचा भारत-पाकिस्तान सामना अगदी त्याच ठिकाणी होणार आहे, तेव्हा चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न “हा सामना होणार तरी का?”
Accuweather.com च्या अहवालानुसार, कोलंबोमध्ये रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळी 8 ते 10 दरम्यान सतत पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर 11 ते 12 च्या सुमारासही पावसाची शक्यता कायम आहे. दुपारी मात्र हवामान थोडं स्थिर होण्याची चिन्हं दिसत आहेत. भारत-पाकिस्तान महिला संघांचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे सामना सुरू असताना मुसळधार पाऊस पडेल असं दिसत नाही, पण श्रीलंकेत सध्या लोटणारा मॉन्सून सीझन असल्याने हवामानातील बदल क्षणात होऊ शकतो.
दोन्ही देशांच्या चाहत्यांची नजर या सामन्यावर खिळली आहे. मात्र, हवामानाचा अंदाज पाहता सगळ्यांनाच आता थोडी काळजी वाटू लागली आहे. सामना रद्द झाल्यास क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसरू शकतो. खेळाडूंना तयारी करूनही खेळण्याची संधी मिळाली नाही तर त्यांच्यासाठीही ही निराशाजनक बाब ठरेल.
Two crucial #CWC25 points up for your grabs today in Colombo
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2025
All the broadcast details for #INDvPAK are available here https://t.co/3BqKJPeYJB pic.twitter.com/uOeSF0I7MV
आता सर्वांच्या नजरा कोलंबोच्या आकाशावर आहेत. जर पाऊस थांबला, तर भारत-पाकिस्तानची ही टक्कर पुन्हा एकदा बघायला मिळेल.