)
India and Pakistan players High Five: आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेटर्सनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणं टाळलं होतं. महिला खेळाडूंनीही वर्ल्डकपमध्ये याची पुनरावृत्ती केली. दरम्यान हॉकी स्पर्धेत मात्र खेळाडूंनी याउलट भूमिका घेतली. मलेशियात हॉकी स्पर्धेच्या आधी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना हाय फाइव्ह दिले. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी मलेशियातील जोहोर बाहरू येथे सुलतान ऑफ जोहोर कप सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या अंजर 21 खेळाडूंनी एकमेकांना अभिवादन केलं. दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजल्यानंतर खेळाडूंनी मैत्रीपूर्ण संबंध दर्शवले. गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध पाहता सर्वांचं याकडे लक्ष होतं.
सीमापार वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी त्यांच्या सामन्यांदरम्यान हस्तांदोलन टाळल्यानंतर काही आठवड्यांनंतरच हे घडलं आहे. गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. तसंच महिला संघाने कोलंबो येथे झालेल्या महिला विश्वचषक सामन्यादरम्यान सामन्यापूर्वी आणि नंतरच्या शुभेच्छा देण्याचंही टाळले.
सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये पाकिस्तान हॉकी फेडरेशन (पीएचएफ) च्या स्पष्ट निर्देशांचे पालन करण्यात आलं. त्यांनी खेळाडूंना शांत राहण्याचं आणि भारतीय खेळाडूंशी अनावश्यक संघर्ष टाळण्याचे निर्देश दिले होते.
"खेळाडूंना सांगण्यात आलं आहे की जर भारतीय खेळाडू सामन्यापूर्वी किंवा नंतर हस्तांदोलन करत नसतील तर त्यांच्या हावभावाकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. त्यांना असेही सांगण्यात आले आहे की खेळादरम्यान कोणताही भावनिक वाद किंवा संकेत टाळा," असं पीएचएफच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.
दरम्यान, पाकिस्तानने यापूर्वी राजगीर येथे होणाऱ्या पुरुष हॉकी आशिया कप 2025 मधून वेळापत्रक आणि लॉजिस्टिकच्या कारणांमुळे माघार घेतली होती. विशेषतः भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषकातील त्यांचा सहभाग अनिश्चित आहे.
सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास हा सामना 3-3 ने अनिश्चित राहिला. सामन्यानंतरही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं.