१ मॅच ८ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली.

Updated: Dec 18, 2019, 10:49 PM IST
१ मॅच ८ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस title=

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली. १३८ बॉलमध्ये १५९ रन करुन रोहित शर्मा माघारी परतला. रोहितच्या या खेळीमध्ये १७ फोर आणि ६ सिक्सचा समावेश होता. या कामगिरीनंतर रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे आठवं दीडशतक होतं. वनडेमध्ये सर्वाधिक दीडशतकं करण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. डेव्हिड वॉर्नर याने वनडेमध्ये १५० पेक्षा जास्त स्कोअर ६ वेळा तर सचिन तेंडुलकर आणि क्रिस गेलने ५ वेळा केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक ३ द्विशतकं करण्याचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे.

२०१९ या वर्षातला हा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे. मुख्य म्हणजे २०१३ पासून प्रत्येक वर्षी रोहितच्याच नावावर भारताचा वर्षातला सर्वाधिक स्कोअरचा विक्रम आहे. २०१३ साली २०९ रन, २०१४ साली २६४ रन, २०१५ साली १५० रन, २०१६ साली १७१ रन, २०१७ साली २०८ रन, २०१८ साली १६२ रन आणि २०१९ साली १५९ रन रोहितने केलेल्या या रन प्रत्येक वर्षातला सर्वाधिक स्कोअर ठरला. 

Highest individual score by Indians in ODIs in recent years:

2013 - Rohit (209)
2014 - Rohit (264)
2015 - Rohit (150)
2016 - Rohit (171*)
2017 - Rohit (208*)
2018 - Rohit (162)
2019 - ROHIT (146*)

Incredible feat by the hitman! #RohitSharma @ImRo45 #IndvWI

— Bharath Seervi (@SeerviBharath) December 18, 2019

२०१७ पासून सर्वाधिक शतकं करणाच्याबाबतीत रोहितने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. २०१७ पासून रोहितने १८ शतकं केली आहेत. तर विराटने या कालावधीत १७, जॉनी बेयरस्टोने ९, शिखर धवन, बाबार आजम, एरॉन फिंच आणि जो रुट यांनी प्रत्येकी ८ शतकं केली आहेत.

एका वर्षात सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या रेकॉर्डमध्ये रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने १९९८ साली सर्वाधिक ९ वनडे शतकं केली होती. गांगुलीने २००० साली ७, डेव्हिड वॉर्नरने २०१६ साली ७ आणि आता २०१९ साली रोहित शर्माने ७ शतकं केली आहेत. २०१९ या वर्षात भारताची आणखी एक वनडे मॅच बाकी आहे. या मॅचमध्ये आणखी १ शतक करुन रोहितला स्वतंत्रपणे दुसरा क्रमांक गाठण्याची संधी आहे.

Most ODI 100s in a calendar year:

9 - Tendulkar, 1998 (33 inns)
7 - Ganguly, 2000 (32)
7 - Warner, 2016 (23)
7* - ROHIT, 2019 (26)#IndvWI

— Bharath Seervi (@SeerviBharath) December 18, 2019

रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २८वं शतक ठरलं. याचसोबत रोहितने शतकांच्याबाबतीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची बरोबरी केली आहे. सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शतकांच्याबाबतीत रोहितच्या पुढे आता फक्त रिकी पाँटिंग, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर आहेत. रिकी पाँटिंगने वनडेमध्ये ३० शतकं, विराटने ४३ शतकं आणि सचिनने ४९ शतकं केली आहेत. 

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही रोहितने आपल्या नावावर केला आहे. रोहितने धोनीचा २८ सिक्सचा विक्रम मोडीत काढला आहे. या यादीत विराट कोहली २५ सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने या वर्षात वनडेमध्ये १३०० पेक्षा जास्त रन केल्या आहेत. यावर्षी एवढ्या रन करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने २०१९ या वर्षात २७ वनडे मॅच खेळल्या. रोहितनंतर विराटने यावर्षी २५ मॅचमध्ये १२९२ रन केले आहेत. 

एका वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला आहे. २०१९ या वर्षात रोहितने ७७ सिक्स मारले आहेत. याआधीही हा विक्रम रोहितच्याच नावावर होता. २०१८ साली रोहितने ७४ सिक्स तर २०१७ साली ६५ सिक्स मारले होते. २०१५ साली एबी डिव्हिलियर्सने ६३ सिक्स आणि इयन मॉर्गनने २०१९ साली ६० सिक्स लगावले.