ड्रेसिंगरुममधील 'त्या' एका वाक्यामुळे भारतीय महिला World Cup जिंकल्या! कोच मुजुमदारचा खुलासा

Amol Muzumdar On India Winnnig Women World Cup 2025: अमोल मुजुमदार यांनी पार पाडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. मात्र भारताच्या ऐतिहासिक विजयासाठी ड्रेसिंगरुममधील फळ्यावरचं एक वाक्य कारणीभूत ठरल्याच अमोलने सांगहितलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2025, 03:15 PM IST
ड्रेसिंगरुममधील 'त्या' एका वाक्यामुळे भारतीय महिला World Cup जिंकल्या! कोच मुजुमदारचा खुलासा
काय म्हटलंय अमोल मुजुमदार यांनी जाणून घ्या

Amol Muzumdar On India Winnnig Women World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 च्या ट्रॉफीवर भारतीय संघाने रविवारी पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 52 धावांनी पराभव करत ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. महिला संघाचा प्रशिक्षक अमोल मुजुमदारचा या विजयात मोठा वाटा आहे. या ऐतिहासिक विजयानंतर अमोल मुजुमदार सोमवारी त्याच्या घरी पोहचले. ते राहत असलेल्या सोसायटीमध्ये जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या सोसायटीमधील लोकांसमोर छोटेखानी भाषण करताना अमोलने भारतीय संघ कशाप्रकारे ड्रेसिंग रुममधील फळ्यावर लिहिलेल्या एका वाक्यामुळे हे यश संपादित करु शकला याबद्दल माहिती दिली. 

Add Zee News as a Preferred Source

सोसायटीत जंगी स्वागत

सोसायटीमधील उत्साह आणि जंगी स्वागत पाहून अमोल भारावून गेला. "मला हे असं स्वागत अपेक्षित नव्हतं. मी बायकोला फ़ोन केला आज घरी येतो उद्या जायचे आहे. मी विशेष परवानगी घेऊन आलो होतो. घरी जाऊन मस्त वरण-भात खाईन," असं म्हणत अमोलने घराची ओढ लागत असल्याचं प्रांजळपणे कबूल केलं.

"तुम्ही आला आहात आणि भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आमचे कुटुंब आभारी आहे, मला वडिलांनी एकच गोष्ट सांगितली काम करत राहा. खेळत होतो तेव्हा सांगितले रन करत राहा. रन करत राहा, काम करत राहा याचे रूपांतर होऊन विश्वकप भारतात येईल हे मला माहीत नव्हते," अस अमोल म्हणाला. 

त्या एका वाक्यामुळे जिंकलो वर्ल्डकप

"सर्वांनी अंतिम सामना पाहिला असेल यातून प्रोत्साहन घ्या. आपल्या देशाला आपण स्पोर्ट्स लविंग नेशन बनूया," असं आवाहन अमोलने केलं. एवढ्यावरच न थांबता भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या उपांत्यफेरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याबद्दल अमोल आवर्जून बोलला. "सेमी फायनमध्ये ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या. मात्र परिस्थिती पाहता ते जवळपास 360 धावांचं टार्गेट असल्यासारखं होतं. त्यावेळी सगळे जण खचले होते. तेव्हा पहिल्या डावानंतर संपूर्ण भारतीय संघ ड्रेसिंगरुममध्ये असताना मी समोरच्या बोर्डावर एकच वाक्य लिहिले. ते वाक्य होतं, "We Just Need One More Run For Final," असं अमोलने सांगितलं. या वाक्यामुळे मुली प्रेरित झाल्या आणि त्यांनी विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करुन थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. जिथे त्यांनी सामना 52 धावांनी जिंकून इतिहास रचला.

खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

भारताच्या विजयाचं श्रेय अमोलने खेळाडूंना दिलंय. "खेळाडुंमुळे हे शक्य झाले. दोन वर्ष त्या मुलींनी अमाप प्रयत्न केले" असं अमोल म्हणाले. पुढे बोलताना अमोलने त्याच्या सोसायटीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. "'जयविजय'बद्दल मी काय बोलू? आज 22 वर्ष झाले. मला बरोबर आठवत आहे कारण माझ्या लग्नाला 23 वर्ष झालेत. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो, मला विचारले की कुठे राहतो? तर मी सांगतो पार्ले येथे राहतो. तेथे 'जयविजय'मध्ये राहतो," असं अमोलने म्हटलं. तसेच भाषणाच्या शेवटी अमोलने, "तुमच्या शुभेच्छा महिला संघासोबत अश्याच असू द्या," असं आवर्जून सांगितलं.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More