Ruturaj Gaikwad on MS Dhoni Retirement: आयपीएलच्या 18 व्या हंगमाला सुरुवात झाली असून आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघ आपापसात भिडणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने यावर भाष्य केलं आहे.
धोनी आज 43 वर्षांचा असतानाही संघासाठी योगदान देत असल्याचं ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे. तसंच त्याच्या क्षमतांवरही त्याने भाष्य केलं आहे. आयपीएलमध्ये संघासाठी तो महत्त्वपूर्ण खेळी करेल अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे. “संघात बरेच नवीन खेळाडू सामील झाले आहेत आणि कधीकधी ते सध्या तो जितका चांगला खेळत आहे तितकं चांगलं खेळण्यासाठी ते संघर्ष करत असतात. त्यामुळे माझ्यासह अनेकांना प्रेरणा मिळते,” असं ऋतुराज गायकवाड म्हणाला आहे.
“43 वर्षांच्या वयात तो जे काही करत आहे ते मला उल्लेखनीय वाटते. गेल्या दोन वर्षांपासून आमच्याकडे काही जमेच्या बाजू आहेत. म्हणून, मला वाटतं की खरोखर काहीही बदललेले नाही आणि आशा आहे की तो आमच्यासाठी त्या महत्त्वाच्या खेळी करत राहील,” असं तो पुढे म्हणाला.
"मला वाटतं की तो जे काही साध्य करायचं आहे किंवा आयपीएलमध्ये भूमिका काय असेल याचा विचार करुनच सराव करत असतो. म्हणून, त्याला ते फार सोपं जातं. शक्य तितके षटकार मारणं, योग्य स्विंग मिळवणं, सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहणं यासाठी त्याचा प्रयत्न सुरु असतो," असं त्याने सांगितलं.
"मला वाटते की सुरुवातीला तो हेच करण्याचा प्रयत्न करत होता आणि नंतर मला कधीच वाटलं नव्हतं की तो फॉर्ममध्ये नाही. जर तुम्ही आता पाहिले तर, सचिन तेंडुलकर देखील (मास्टर्स लीगमध्ये) 50 वर्षांचा असतानाही सध्या जितका उत्तम फलंदाजी करत आहे तितकाच तो फलंदाजी करत आहे. म्हणून, मला वाटते की (धोनीसाठी) अजून बरीच वर्षे बाकी आहेत," असं त्याने त्याच्या निवृत्तीवर भाष्य करताना म्हटलं.