Virat Kohli Names Toughest Bowler He Ever Faced: जागतिक क्रिकेटमध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळापासून आपला दबदबा कायम ठेवणारा भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या इंडियन प्रिमिअर लीगची तयारी करत आहे. नुकत्याच भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये विराटची कामगिरी भारताला चषक जिंकवून देण्यासाठी महत्त्वाची ठरली. विराट कोहली मैदानात असल्यावर गोलंदाजांना घाम फुटतो. मात्र विराटला घाम फोडणारा आणि खेळण्यास कठीण वाटणारा गोलंदाज कोण असा प्रश्न अनेकदा चर्चेत आला आहे. मात्र या प्रश्नाला आता विराटनेच उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी असो किंवा इंग्लंडचा जेम्स अँडरसन असो किंवा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स असो सर्वांच्या गोलंदाजीचा समाना विराटने केला आहे. अगदी फिरकीपटूंपासून ते वेगवान गोलंदाजांपर्यंत सर्वांचा समाचार घेणाऱ्या विराटला कोणता गोलंदाज खेळून काढण्यासाठी सर्वात अवघड वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सराव सुरु होण्याआधी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत विराटला हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना विराटने घेतलेलं नाव ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
कोणता गोलंदाज खेळून काढणं सर्वात कठीण आहे? असं विचारलं असता विराटने 31 वर्षीय वेगवान गोलंदाजाचं नाव घेतलं. हा गोलंदाज मूळचा अहमदाबादचा असून तो आयपीएलमध्ये 'मुंबई इंडियन्स'च्या संघाकडून खेळतो. खरं तर या गोलंदाजाचा दरारा जागतिक क्रिकेटमध्ये दिसून येतो. आयसीसीच्या गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या गोलंदाजाचं नाव आहे जसप्रीत बुमराह! विराटने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने सामना केलेल्या गोलंदाजांमध्ये बुमराह सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे. बुमराहने मला आयपीएलमध्ये अनेकदा बाद केलं आहे, असंही सांगायला विराट विसरला नाही.
बुमराह विरुद्ध खेळताना आपल्याला घाम फुटतो अशी कबुलीच विराटने दिली आहे. "यात काही शंकाच नाही की जसप्रीत हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याने मला आयपीएलमध्ये अनेकदा बाद केलं आहे. मला त्याच्या गोलंदाजीवर खेळताना अनेकदा चांगल्या धावाही करता आल्या आहेत. त्यामुळेच तो गोलंदाजी करत असताना मी बॅटींग करत असतो तेव्हा, माझा असा विचार असतो की, "ओके, आता मजा येणार आहे." कारण आम्ही एकमेकांविरोधात नेट्समध्ये फार नियमितपणे एकत्र सराव करत नाही," असं विराटने मुलाखतीत म्हटलं असून हा व्हिडीओ आरसीबीच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
"तो आणि मी फारच क्वचित नेट्समध्ये सराव करतो पण तो सुद्धा एखाद्या सामन्यासारखाच असतो. अगदी आयपीएलचा सामना सुरु असल्याप्रमाणे आम्ही एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो. मला प्रत्येक बॉलवर धावा करायच्या असतात आणि त्याला माझी विकेट काढायची असते. त्याच्या गोलंदाजीवर आऊट होऊ नये असा माझा प्रयत्न असतो. त्यामुळेच तो आतापर्यंत मी फलंदाजी करताना आनंद घेत आणि आव्हानात्मक म्हणून सामना केलेला सर्वोत्तम गोलंदाज आहे," असं विराट म्हणाला.
Ever wondered who’s the toughest bowler Virat’s ever faced? Catch him spill the tea, at the
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 17, 2025
बुमराहने 4 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याने आरसीबीविरुद्ध चेन्नईच्या मैदानावरच पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळेस 19 वर्षीय बुमराहच्या गोलंदाजीवर पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावला होता. मात्र पाचव्या चेंडूवर बुमराहने कोहलीला बाद केलं होतं. आजपर्यंत बुमराहने आय़पीएलमधील 133 सामन्यांमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या तीन खेळाडूंपैकी तो एक आहे.