IPL 2025: आयपीएलचा 18 व्या हंगामाला सुरुवात झालीय. अनेक नवे खेळाडू,कॅप्टन्स यामुळे यंदाचा हंगामही रंगतदार होणार आहे. या सर्वात 13 वर्षीय क्रिकेट सेन्सेशन वैभव सूर्यवंशीचे नाव आजकाल प्रत्येकाच्या ओठांवर आहे. वैभव हा आयपीएल 2025 चा सर्वात तरुण करोडपती आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. त्याने आधीच एक विक्रम करून जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण आता तो सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांना दिलेल्या खुल्या आव्हानामुळे चर्चेत आहे. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादसोबत आहे. कसं आहे वैभवचं आतापर्यंतचं करिअर? सचिन, युवराजबद्दल काय म्हणाला वैभव? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट प्रवासावर त्याच्या वडिलांचा मोठा प्रभाव आहे. क्रिकेटर बनावं हे वैभव सूर्यवंशीपेक्षा त्याच्या वडिलांचे होते. वैभवने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीतही याचा उल्लेख केला. बिहारमध्ये सुविधांची वानवा आणि परिस्थीतीमुळे त्याचे वडील क्रिकेटपटू कसे बनू शकले नाहीत हे त्याने सांगितले. पण मला आता त्यांचे स्वप्न जगायचे असल्याचे तो म्हणतो. वैभवला क्रिकेटपटू बनवण्यासाठी, त्याला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी वडील त्याला दररोज समस्तीपूरहून पटना येथील झेनिथ क्रिकेट अकादमीत आणत असत. तिथे वैभवने प्रशिक्षक मनीष ओझा यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. वैभव आता फक्त 13 वर्षांचा आहे. म्हणजे जेव्हा आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला तेव्हा त्याचा जन्मही झाला नव्हता. पण आता वैभव आयपीएलमध्ये पदार्पणाची तयारी करतोय. जेव्हा वैभव सूर्यवंशीचे नाव लिलावात आले तेव्हा अनेक टीम्सनी त्याच्यासाठी बोली लावली पण शेवटी राजस्थान रॉयल्सने बोली जिंकली. राजस्थान रॉयल्सने वैभवला 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण वैभवची खरी परीक्षा आता होणार आहे. जेव्हा तो आयपीएलमध्ये खेळेल तेव्हा त्याला जगभरातील महान खेळाडूंचा सामना करावा लागेल.
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 100 धावा केल्या आहेत. वैभवने 6 लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने 132 धावा केल्या आहेत. आतापर्यंत वैभवने टी-20 मध्ये फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यात त्याने 13 धावा केल्या. हे आकडे फारसे चांगले दिसत नाहीत पण ज्यांनी वैभवला खेळताना पाहिले आहे ते त्याच्या स्फोटक शैलीने प्रभावित झाले आहेत. वैभव सूर्यवंशी यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करू शकतो. सहसा वैभव सूर्यवंशी हा सलामीवीर असतो. म्हणजेच तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सलामी खेळताना दिसू शकतो. जोस बटलरच्या जाण्याने राजस्थानमध्ये सलामीवीर फलंदाजाचे स्थान रिक्त झाल्याने संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल देखील सलामीला येऊ शकतात, पण याचा परिणाम संघाच्या मधल्या फळीवर होऊ शकतो. वैभव सूर्यवंशी हा पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली तर उत्तम होईल, असं म्हटलं जातंय. वैभवची बॅट तळपली तर तो निश्चितच टीमला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊ शकतो.
वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांचा सर्वात कमी वयात रणजी पदार्पण करण्याचा मोठा विक्रम आधीच मोडला आहे. यानंतर त्याला कसे वाटतंय आणि त्याच्या भविष्यातील योजना काय आहेत? असे विचारण्यात आले. यावर बोलताना 13 वर्षीय वैभवने फक्त एवढंच सांगितलं, 'मला बरे वाटतय. भविष्यात मी त्यांचे आणखी विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेन.' स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
तसं पाहायला गेलं तर वैभव सूर्यवंशीचे हे विधान सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांचे विक्रम मोडण्याचे आव्हान वाटू शकते. पण त्याचा अर्थ त्याहून खूप जास्त आहे. 13 वर्षांच्या मुलामध्ये किती आत्मविश्वास आहे, हे या विधानावरुन दिसून येते. त्याच्याच धाडसामुळे तो बिहारमधील समस्तीपूर ते आयपीएलपर्यंतचा प्रवास करतोय.