IPL 2025 Revised Schedule: भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा 17 मेपासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने आयपीएलचं नवं वेळापत्रक जारी केलं आहे. त्यानुसार 6 ठिकाणी 17 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत, जे दोन रविवारी खेळवले जातील. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने सर्व खेळाडूंना मंगळवारपर्यंत एकत्र येण्यास सांगितलं होतं.
क्वालिफायर 1 – 29 मे
एलिमिनेटर – 30 मे
क्वालिफायर 2 – 1 जून
अंतिम सामना – 3 जून
प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणांची माहिती नंतर जाहीर केली जाणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. यापूर्वी आयपीएल 2025 च्या मूळ वेळापत्रकाप्रमाणे 25 मे रोजी आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाणार होता.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. गुरुवार 8 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर पंजाब आणि दिल्ली यांच्यातील चालू सामन्यादरम्यान ब्लॅकआऊट करण्यात आला होता. यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी परतले होते.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना मधेच रद्द करण्यात आला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये कोणतेही गुण वाटप झालेले नाहीत. आधीच्या सामन्यानुसार, दिल्ली 11 सामन्यांनंतर 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. केकेआर आणि लखनौ सुपर जायंट्स हा संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. राजस्थान आणि सीएसके या गुणतालिकेत तळाशी आहेत.