IPL 2025 Sunil Gavaskar To BCCI: भारत आणि पाकिस्तानमध्ये 'ऑपरेश सिंदूर'नंतर वाढत्या तणावामुळे गेल्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या 18 वं पर्व स्थगित करण्यात आलेलं. मात्र आता हा तणाव निवळला असून परिस्थिती पूर्वव्रत झाली आहे. म्हणूनच या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, 17 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यातील सामन्याने पुन्हा सुरू होईल. स्पर्धा पुन्हा सुरू होण्यापूर्वी, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआय एक विशेष विनंती केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर गावसकर यांनी बीसीसीआयला हा सल्ला दिला. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत 6 मे आणि 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणच्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा भारताने खात्मा केला.
मात्र भारताच्या हल्ल्यानंतर खवळेलेल्या पाकिस्तानने भारतावर अनेकदा ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने हे हल्ले परतवून लावले. दोन्ही देशांमधील तणाव दिवसोंदिवस वाढत गेला. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएल स्थगित करावे लागले. एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करत असल्याची घोषणा बीसीसीआयने केली. युद्धबंदीमुळे ही स्पर्धा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नवीन वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र या साऱ्या घडामोडींदरम्यान गावसरकांनी भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाला खेळासारखे वागवावे आणि ज्या कुटुंबांनी त्यांचे जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्या भावनांचा आदर करावा.
पहलगाम आणि त्यानंतर भारत पाकिस्तान संघर्षात सीमेजवळील नागरिकांबरोबरच शहीद झालेल्या सैनिकांच्या 'कुटुंबीयांच्या भावना' लक्षात घेत आयपीएलच्या यंदाच्या वर्षीच्या उर्वरित सामन्यांसाठी तीन गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. उर्वरित पर्वासाठी ओव्हरदरम्यान वाजणारे संगीत, डीजे आणि चीअरलीडर्स बंद करण्याची विनंती गावसकरांनी केली आहे. “हे शेवटचे काही सामने आहेत आणि मला खरोखरच ते फार मनापासून पाहायचे आहेत. आयपीएलचे आतापर्यंत जवळजवळ 60 सामने झाले आहेत. मला वाटते की हे शेवटचे 15 किंवा 16 सामने शिल्लक राहिले आहेत. जे काही मागील काही दिवसांमध्ये घडले त्यात काही कुटुंबांनी त्यांचे जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत. त्यामुळे मला खरोखरच अशी आशा आहे की, उर्वरित सामन्यांमध्ये संगीत वाजवू नये. दोन षटकांच्या मध्ये असलेल्या वेळात डीजे लावू नये आणि आरडाओरड करु नयेत,” अशी अपेक्षा गावसकरांनी 'स्पोर्ट्स टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
“खेळाला खेळासारखं खेळू द्या. गर्दी येऊ द्या. मला वाटतं ही केवळ स्पर्धा म्हणून पाहूयात. स्पर्धेचा समतोल राखूयात. त्यात फक्त नाचणाऱ्या मुली नाहीत. ज्या कुटुंबांनी त्यांचे जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्या भावनांचा आदर करण्याचा क्रिकेट हा एक उत्तम मार्ग असेल,” असं गावसकर म्हणाले.
भारताचे माजी कर्णधार असलेल्या गावसकर यांनी, असेही म्हटले की सीमेवर शत्रुत्व असताना खेळ सुरू ठेवण्यात काही अर्थ नसल्याने एका आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय योग्यच होता. “निलंबन अचानक आणि अगदी योग्यरित्या झाले, असे मला वाटतं. कारण त्या टप्प्यावर, शत्रुत्वामुळे खेळासाठी जागा नव्हती. पण आता युद्धबंदी असल्याने, मला वाटते की स्पर्धा पुन्हा सुरू होईल,” गावसकर म्हणाले.
बीसीसीआयने सोमवारी रात्री आयपीएल 2025 हंगामाच्या सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 17 मे पासून सुरू होणारे 17 सामने सहा ठिकाणी खेळवले जातील. अंतिम सामना 3 जून रोजी खेळला जाणार आहे. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडरचा समावेश आहे. हे डबल हेडर दोन रविवारी खेळले जाणार आहेत. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर अनुक्रमे 29 आणि 30 मे रोजी खेळले जातील, तर क्वालिफायर 2 1 जून रोजी खेळली जाणार.