...अन् संतापलेल्या शेन वॉर्नने रवींद्र जाडेजाला टीम बसमधून उतरवलं; हॉटेलला चालत येण्यास पाडलं भाग

आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न रवींद्र जाडेजाचं कौशल्य पाहून प्रभावित झाला होता. आपण त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत जास्त मुभा देत होतो हे त्याने मान्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 18, 2025, 02:51 PM IST
...अन् संतापलेल्या शेन वॉर्नने रवींद्र जाडेजाला टीम बसमधून उतरवलं; हॉटेलला चालत येण्यास पाडलं भाग

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आयपीएलमधील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या कोअर सदस्यांपैकी रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) एक आहे. पण चेन्नई संघाचा अविभाज्य घटक होण्याआधी रवींद्र जाडेजा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात असताना  शेन वॉनने (Shane Warne) त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतलं होतं, तसंच त्याला रॉकस्टार असं नावंही दिलं होतं. शेन वॉर्न आणि जाडेजाच्या या संघाने पहिल्याच हंगामात आयपीएल स्पर्धा जिंकली होती. 

शेन वॉर्नने आपलं आत्मचरित्र 'No Spin' मध्ये जाडेजाबद्दल लिहिलं आहे. आपण इतर खेळाडूंच्या तुलनेत रवींद्र जाडेजाला जास्त मुभा देत होतो असं त्याने मान्य केलं आहे. तसंच आपल्याला रवींद्र जाडेजाला शिस्त लावावी लागली असंही सांगितलं आहे. 

शेन वॉर्नने लिहिलं आहे की, "आम्हाला (जडेजा) त्याच्या दृष्टिकोन आणि उत्साह पाहिल्यापासून तो आवडू लागला होता. त्याच्यात थोडं वेगळं कौशल्य दिसत असल्याने आम्ही त्याला इतरांपेक्षा जास्त वेळ दिला. परंतु त्याच्या शिस्तीचा अभाव ही एक समस्या होती,. कारण यामुळे कधीकधी तरुण खेळाडू चुकीच्या मार्गावर जातात. आम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण मी उशीर करणाऱ्यांना सहन करू शकत नाही."

'जाडेजा नेहमीच उशिरा येत असे'

"रवींद्र जाडेजा नेहमीच उशिरा यायचा. पहिल्या वेळी बॅगा आणि सामानाबाबत थोडा गोंधळ व्हायचा, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या वेळीही तसंच झालं. बस सकाळी 9 वाजता सरावासाठी निघाली आणि तो त्यात नव्हता. त्याला स्वतः मैदानावर जावे लागले आणि अर्थातच पुन्हा उशीर झाला. सरावानंतर परत येताना, मी हॉटेलकडे जाताना अर्ध्या रस्त्यात बस थांबवली आणि म्हणालो, 'मित्रांनो, आज सकाळी पुन्हा कोणीतरी उशिरा आलं होतं. रवी, इथे उतर आणि घरी चालत जा.' त्याच्या एका मित्राने गोंधळ घातला, म्हणून मी त्यालाही उतरण्यास सांगितलं आणि ते दोघे एकत्र हॉटेलमध्ये चालत येऊ शकतात असं सांगितलं. त्यानंतर कोणीही उशिरा आलं नाही," अशी आठवण शेन वॉर्नने सांगितलं. 

वॉर्नने जाडेजाने त्याला दाखवलेल्या आदराबद्दलही सांगितलं. "आता जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा तो मला 'सर' म्हणतो आणि त्या दिवसांबद्दल बोलतो. मी त्याला सांगतो की तो जे काही कमावतो त्याच्यातील 10 टक्के हिस्सा मला मिळायला हवा!", असंही वॉर्नने पुस्तकात लिहिलं आहे.