वाढदिवसाला जेम्स फॉकनरकडून जीवलग मित्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर
मी समलैंगिक असा प्रचार गैरसमजातून - जेम्स फॉकनर
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने म्हटल्याप्रमाणे, त्याने आपल्या जीवलग मित्रासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी जेम्स फॉकनर त्याची आई आणि त्याचा जीवलग मित्र रॉब जुब यांच्यासोबत डिनर डेटला गेला होता. 'माझी आई आणि माझा बॉयफ्रेंड रॉब जुब. मागच्या ५ वर्षांपासून आम्ही दोघं एकत्र आहोत,' असं कॅप्शन फॉकनरने या फोटोला दिलं आहे.
फॉकनरने हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर त्याच्या फॅन्सनी समलैंगिक असल्याचा गैरसमज करून घेतला. आपण समलैंगिक नसल्याचं जेम्सनं मंगळवारी म्हटलंय. त्याच्या टीमने देखील याविषयी सर्वांचा गैरसमज दूर केला आहे. या पोस्टनंतर फॉकनर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या नव्या ट्विटमध्ये फॉकनर म्हणतो, 'माझ्या कालच्या ट्विटमुळे काहीतरी भ्रम निर्माण झालाय. एलजीबीट समुदायाकडून समर्थन मिळणं खूपच शानदार होतं, पण मी समलैंगिक नाही... प्रेम हे प्रेमच असतं हे कधीही विसरू नका पण रॉबर्ट जुब माझा केवळ एक चांगला मित्र आहे. काल आम्ही एकत्र राहत पाच वर्ष पूर्ण केली एवढचं... सहकार्य करण्यासाठी सर्वांचे आभार'.
ऑस्ट्रेलियाच्या संसदेने २००७ साली वैवाहिक कायद्यामध्ये बदल करून समलैंगिक विवाहाला परवानगी दिली. काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंड महिला क्रिकेटपटू हेले जेनसनने मेलबर्न स्टार्स टीममधली आपली माजी साथीदार ऑस्ट्रेलियन खेळाडू निकोला हेनकॉकसोबत समलैंगिक विवाह केला होता. बिग बॅश लीगची टीम मेलबर्न स्टार्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करून या लग्नाची माहिती दिली होती. बीबीएलने या दोघींना सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
बिग बॅश लीगमध्ये जेनसन पहिल्या दोन मोसमांमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळली. यानंतर तिसऱ्या मोसमात ती मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळली. दुसरीकडे हेनकॉक अजूनही मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे.