)
IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) तयारीला सुरुवात झाली असून येत्या काहीच दिवसात या सीजनसाठी मिनी ऑक्शन सुद्धा पार पडेल. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) संघातून एक मोठी बातमी समोर येतेय. आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावणारा केकेआरचा संघ आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफमध्ये सुद्धा स्थान मिळवू शकला नव्हता. त्यांचा परफॉर्मन्स बराच ढासळला. आता अशी बातमी समोर येतेय की केकेआर अभिषेक नायरला (Abhishek Nair) हेड कोच म्हणून नियुक्त करत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार अभिषेक नायरला मागच्या आठवड्यात या निर्णयाची माहिती देण्यात आली. केकेआर लवकरच याबाबत अधिकृतपणे घोषणा करणार आहे.
42 वर्षांचा अभिषेक नायर हा आयपीएल 2026 मध्ये चंद्रकांत पंडितची जागा घेईल. चंद्रकांत पंडित 3 सीजन केकेआरचे हेड कोच होते. त्यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये केकेआरने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करून तिसरं आयपीएल टायटल जिंकलं होतं. चंद्रकांत पंडितने वर्ष 2022 च्या सीजनमध्ये केकेआरचे कोच बनले. त्यावेळी त्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेतली होती, परंतु आयपीएल 2025 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर चंद्रकांत पंडित आणि केकेआर वेगळे झाले.
वर्ष 2018 पासून अभिषेक नायर हा कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅनेजमेंटचा भाग होता. नायरने 2018 ते 2024 पर्यंत असिस्टेंट कोच म्हणून भूमिका बजावली. आयपीएल 2024 मध्ये जेव्हा संघाने हा खिताब जिंकला तेव्हा अभिषेक नायर हे कोचिंग स्टाफचा भाग होता. 2024 मध्ये जेव्हा तो टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये असिस्टेंट कोच म्हणून सामील झाला तेव्हा त्याला केकेआर सोडावे लागले. तो 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत केकेआरमध्ये परतला आहे. आता तो केकेआरचा हेड कोच म्हणून दिसेल. अभिषेक नायर हा रोहित शर्माचा खूप चांगला मित्र आहे. ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज दौऱ्यापूर्वी तो रोहित शर्मा सोबत सराव सत्रात अनेकदा दिसला.