IPL 2025 : आयपीएल 2025 च्या (IPL 2025) सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. वर्षभर जगभरातील क्रिकेट चाहते ही टी 20 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असतात. जसं जशी ही स्पर्धा जवळ येतेय, तसं तसे खेळाडू आणि स्पर्धेसंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल हा यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) आयपीएल 2025 खेळण्यासाठी उतरणार आहे. मात्र दिल्लीचे सुरुवातीचे काही सामने केएल राहुल (KL Rahul) मिस करणार असल्याची माहिती मिळतेय.
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिसा हीली हिने केएल राहुलबाबत बोलताना ही अपडेट दिली आहे. एलिसा हीली ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार असून ती ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी आहे. स्टार्क आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. एलिसा हीलीने सांगितले की केएल राहुल दिल्लीच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही कारण त्याची पत्नी अथिया शेट्टी ही गरोदर असून सध्या दोघे त्यांच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी नोव्हेंबर 2024 मध्ये आपल्या चाहत्यांना दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार एप्रिलमध्ये अथिया शेट्टी बाळाला जन्म देणार आहे.
हेही वाचा : आज पासून सुरु होतोय IPL 2025 चा महासंग्राम, FREE मध्ये कुठे पाहता येतील सामने?
एलिसा हीलीने यूट्यूब चॅनल LiSTNR Sportवर बोलताना म्हटले की, 'हॅरी ब्रुक यावेळी नाहीये, त्यामुळे हे पाहणं महत्वाचं ठरेल की त्याच्या जागी कोणता खेळाडू येईल. त्यांच्याकडे केएल राहुल आहे, पण कदाचित सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळणार नाही. कारण तो सध्या त्याच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे युवा खेळाडूंची फौज आहे जे काहीही करू शकतात. केएल राहुल सुद्धा टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो त्यामुळे तो संघाला मजबुती देईल. त्याला खेळताना पाहणं रोमांचक असेल'.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न 23 जानेवारी 2023 रोजी झालं होतं. अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला होता. केएल राहुल मागचे तीन सीजन लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला, तो संघाचा कर्णधार सुद्धा होता. मात्र यंदा ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आले. तेव्हा ऑक्शनमधून दिल्ली कॅपिटल्सने राहुलला 14 कोटींना खरेदी केले. केएल राहुल हाच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असेल असं बोललं जात होतं, मात्र राहुलने स्वतः कर्णधारपद स्वीकारण्यासाठी नकार दिला अशी माहिती समोर आली. त्यामुळे दिल्ली संघाचं नेतृत्व यंदा अक्षर पटेल करणार आहे.