दुबई : ICC T20 वर्ल्डकप स्पर्धेत, विराट कोहलीचा संघ रविवारी न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरेल. ही मॅच टीम इंडियासाठी करो या मरोची लढत आहे. पराभव झाला तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 10 विकेट्स राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाचे मनोबल खचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान टीम इंडियाचा कर्धाधार विराट असा आहे ज्याला कसं पुनरागमन करायचं हे माहीत आहे. टीम इंडियाचा फॉर्म आणि रेकॉर्ड सध्या दोन्ही चांगल्या स्थितीत आहे. पण विराटकडे एकच गोष्ट नाहीये ती म्हणजे नशीब… हे आम्ही नाही विराट कोहलीचे रेकॉर्ड्स म्हणतायत. टॉसच्या बाबतीत तर विराट फारच त्रस्त आहे.


भारताला हा सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबईच्या मैदानावर खेळायचा आहे. हे तेच मैदान आहे जिथे टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता आणि याठिकाणी टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. लक्ष्य पाठलाग करणाऱ्या संघाला सातत्यपूर्ण विजय मिळतोय. T-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक वेळी पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देतो. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस गमावला तर त्यांना या सामन्यातंही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. संध्याकाळच्या वेळी तिथे दव असल्याने गोलंदाजी करणं कठीण आहे.


विराट सतत हरतोय टॉस


रविवारी नाणेफेक कोणीही जिंकलं तर विराट कोहली किंवा केन विलियम्सन नंतर फलंदाजी करण्यास प्राधान्य देतील, असे रेकॉर्ड्स दर्शवत आहेत. टॉस हा नशिबाचा खेळ आहे. पण एक मात्र नक्की की टॉसच्या बाबतीत विराटचं नशीब चांगलं नाही. जर आपण रेकॉर्डवर नजर टाकली तर टी-20, एकदिवसीय आणि कसोटीच्या मागील 15 सामन्यांपैकी त्याने 14 वेळा टॉस हरला आहे. सध्याच्या विश्वचषकात विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही नाणेफेक गमावली होती. आणि मग पाकिस्तान विरुद्धही तेच झालं.


अधिकवेळा टॉस हरणारा कर्णधार


गेल्या दोन वर्षातील रेकॉर्ड पाहता, जानेवारी 2019 पासून आतापर्यंत विराट कोहली हा कर्णधार आहे जो सर्वाधिक वेळा टॉस हरला आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटीत विराटने सर्वाधिक 35 सामन्यांत टॉस हरला आहे. या कालावधीत त्याला केवळ 13 वेळा नाणेफेक जिंकता आली आहे. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 25 सामन्यांमध्ये टॉस हरला आहे. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आहे. 17 सामन्यात त्यांने नाणेफेक गमावली आहे.


इतिहास न्यूझीलंडसोबत


टीम इंडियाने न्यूझीलंडविरोधात टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकदाही विजय मिळवलेला नाही. याशिवाय टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये 2019 एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा आणि यावर्षीच्या कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना समाविष्ट आहे.