)
बीसीसीआयने भारतीय खेळाडूंवर क्रिकेट दौऱ्यात कुटुंबीयांना सोबत नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने यावरुन नाराजी जाहीर केली आहे. कुटुंब जवळपास असल्याने खेळाडूंना मैदानातील निराशेतून लवकर उभारी मिळण्यास मदत होते. मी माझ्या खोलीत एकटा जाऊन उदास बसू इच्छित नाही. मला सामान्य व्हायचं आहे असं विराट कोहलीने म्हटलं आहे. यावर भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी आपलं मत मांडलं आहे. दौऱ्यात कुटुंबाला सोबत नेण्यावर ते पूर्णपणे सहमत आहेत. परंतु त्यांनी मतभेद असलेल्या या वादग्रस्त मुद्द्याला हाताळताना संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या 1-3 पराभवानंतर, बीसीसीआयने 45 दिवसांपेक्षा जास्त काळाच्या दौऱ्यावर कुटुंबासह भेटींचा कालावधी मर्यादित करण्याचे निर्देश जारी केले, ज्यामध्ये जास्तीत जास्त 14 दिवस कुटुंबासह वेळ घालवता येईल. लहान दौरा असेल तर खेळाडू त्यांच्या कुटुंबासह जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी सोबत येऊ शकतात.
"बरं, मला माहित नाही, ते वैयक्तिक आहे. मला वाटतं हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे," असं 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने 'कपिल देव ग्रँट थॉर्नटन इन्व्हिटेशनल' कार्यक्रमात बोलताना सांगितलं. "माझं मत विचाराल तर हो तुम्हाला कुटुंबाची गरज आहे. पण तुम्हाला कायम सोबत संघाचीही गरज असते," असंही ते म्हणाले आहेत.
नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी सारखे खेळाडू दुबईमध्ये त्यांचे कुटुंबीय सोबत होते. परंतु ते टीम हॉटेलमध्ये राहत नव्हते. त्यांच्या राहण्याचा खर्च बीसीसीआयने नव्हे तर खेळाडूंनी उचलला.
"आमच्या काळात, आम्ही स्वतःच म्हणायचो की दौऱ्याचा पहिला भाग क्रिकेटचा असावा आणि दुसऱ्या भागात कुटुंबानेही येऊन त्याचा आनंद घ्यावा. ते मिश्रण असले पाहिजे," असं कपिल देव यांनी सांगितलं.
BCCI च्या नव्या नियमाबाबत विराट कोहली म्हणाला आहे की, 'कुटुंब जवळपास असल्याने खेळाडूंना मैदानातील निराशेतून लवकर उभारी मिळण्यास मदत होते. मी माझ्या खोलीत एकटा जाऊन उदास बसू इच्छित नाही. मला सामान्य व्हायचे आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या खेळाला एका जबाबदारीप्रमाणे समजू शकता. मला या निर्णयामुळे खूप निराशा वाटली कारण ज्यांचं याबाबतीत काही देणंघेणं नव्हतं अशांना सुद्धा या चर्चेत सामील करण्यात आलं. जर तुम्ही कोणाही खेळाडूला विचारलं की तुम्हाला तुमचं कुटुंब तुमच्या सोबत हवंय का? तर सर्व खेळाडू होच म्हणतील'.