'तुझा इगो बाजूला ठेव,' महेला जयवर्धनेचा रोहित शर्माचा सल्ला ऐकण्यास नकार, 'जर त्याचं ऐकलं असतं तर आज MI...'

IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात रोहित शर्माच्या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई संघाला विजयाची नोंद करता आली.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2025, 08:46 PM IST
'तुझा इगो बाजूला ठेव,' महेला जयवर्धनेचा रोहित शर्माचा सल्ला ऐकण्यास नकार, 'जर त्याचं ऐकलं असतं तर आज MI...'

IPL 2025: मुंबई इंडियन्सने रविवारी अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. एका क्षणी करुण नायरची तुफान फलंदाजी पाहता दिल्ली संघ सहजपणे 206 धावांचं आव्हान अत्यंत सहजपणे पूर्ण करेल असं वाटत होतं. दिल्ली संघाची स्थिती 145 धावांवर 4 गडी बाद होती. त्यांना जिंकण्यासाठी 7 ओव्हर्समध्ये 61 धावांची गरज होती. यावेळी मुंबईने चेंडू बदलण्याची मागणी केली आणि अम्पायर्सनी ती स्विकारली. यानंतर जे काही घडलं ते सर्व नाट्यमय होतं. यामागे रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक होता. 14 व्या ओव्हरला तो डगआऊटमध्ये होता. रोहित शर्माने कर्ण शर्माला तेथून चेंडू बदलण्यास सांगितलं. आयपीएलच्या नवीन नियमानुसार दुसऱ्या डावाच्या 10 व्या षटकानंतर दवाचा परिणाम कमी करण्यासाठी नवीन चेंडू घेण्याची परवानगी आहे.

चेंडू बदलल्यानंतर लगेचच विकेट पडू लागल्या. "रोहित शर्माच्या एका महत्त्वाच्या सल्ल्याने पराभवाचं विजयात रूपांतर केलं. दिल्ली संघ सहजपणे विजयी होत होता. करुण नायर शानदार फलंदाजी करत होता,  त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं. तो पुष्पासारखा खेळत होता, वणव्यासारखा पसरत होता. 13 व्या षटकात दिल्ली जिंकेल असं वाटत होतं. पण लगेचच रोहितने मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेला फिरकीपटूला ओव्हर देण्यास आणि कर्ण शर्माला गोलंदाजीसाठी आणण्यास सांगितलं. मला वाटतं की महेला जयवर्धने रोहित शर्माशी सहमत नव्हता. जर ते जयवर्धनेच्या म्हणण्यानुसार वागले असते तर मुंबई इंडियन्सने हा सामनाही गमावला असता. रोहित शर्मा तिथे होता, त्याच्याकडे सर्वोत्तम रणनीती होती. तो कर्णधार आहे. तो नेहमीच कर्णधारासारखा विचार करतो. कर्णधार हा नेहमीच कर्णधार असतो आणि त्याच्या रणनीतिक कौशल्यामुळे मुंबईला जिंकण्यास मदत झाली," असं हरभजनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं.

"कर्ण शर्माने आक्रमण करत तीन विकेट घेतल्या आणि खेळाला कलाटणी दिली. हा एक सुवर्ण खेळ होता. जर रोहित शर्मा डगआउटमध्ये असता तर तिलक वर्मा लखनौविरुद्ध रिटायऱ् झाला आणि मिशेल सँटनरला मैदानात पाठवण्यात आलं ते घडलं नसतं. महेला जयवर्धनेने वाईट निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने अविश्वसनीय कामगिरी केली. कधीकधी, प्रशिक्षकांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवून संघाला कसा फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. मला आशा आहे की रोहित शर्मा डगआउटमधून त्याचे विचार शेअर करत राहील," असं मतही त्याने व्यक्त केलं. 

दरम्यान, आयपीएलमध्ये रोहित शर्माची अपयशी कामगिरी सुरूच राहिली. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीतही तो मोठी खेळी करु शकला नाही.  फलंदाजीला आल्यानंतर रोहित आणि रायन रिकेल्टन यांनी आक्रमक भूमिका घेत अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण रोहित फक्त 18 धावांवर बाद झाला. 

रोहितच्या नावे आता आयपीएल 2023 नंतर किमान 25 डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर म्हणून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी सरासरी आहे.

आयपीएल 2023 पासून, रोहितने फक्त 24.39 च्या सरासरीने 805 धावा केल्या आहेत, जी सलामीवीराची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी सरासरी आहे. या स्फोटक सलामीवीराच्या पुढे फक्त वृद्धिमान साहा आहे, त्याने 20.28 सरासरीने 507 धावा केल्या आहेत. चालू हंगामात, रोहितने 11.20 च्या सरासरीने फक्त 56 धावा केल्या आहेत.