)
Asia Cup 2025 News in Marathi: या वर्षी सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या टी-20 एशिया कपचं आयोजन होणार होतं, पण आता या स्पर्धेवरच रद्द होण्याचे सावट निर्माण झालं आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे एशिया कपच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ वर संकटाचे ढग अधिकच दाटून येत आहेत. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या वृत्तानुसार, सहा देशांच्या या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे. जरी एसीसीने बैठक नियोजित वेळेनुसार होईल याची पुष्टी केली असली तरी, भारत आणि श्रीलंकेच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
एशियाई क्रिकेट परिषद (ACC) ची महत्त्वपूर्ण बैठक 24 जुलै रोजी बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये होणार आहे. मात्र बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या बैठकीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एशिया कप 2025 चं आयोजनच धोक्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि बांग्लादेशमधील सध्याचे राजकीय संबंध फारसे चांगले नसल्यामुळे बीसीसीआयने बांग्लादेश दौरा आधीच रद्द केला आहे. जरी बीसीसीआयने हा दौरा व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे रद्द केला असल्याचं सांगितलं असलं, तरी खऱ्या कारणांमध्ये राजकीय तणावाचाही मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे.
टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या माहितीनुसार, भारत आणि श्रीलंका या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले, तरी ते ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊ शकतात. ACC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "सर्व सदस्य देशांना त्यांच्या तयारीसाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. प्रत्यक्ष हजेरी शक्य नसेल, तर ऑनलाइन माध्यमातून सहभागी होता येईल."
एशिया कप 2025 हे टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. यजमानपद भारताकडे असूनही हा स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवण्याचा विचार आहे. पाकिस्तानने आपले सामने भारतात न खेळता कदाचित दुबईत खेळण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धाच यूएईत हलवण्याची शक्यता दाट झाली आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, ढाकामधील बैठकीसाठी ते आपले अधिकारी पाठवणार नाहीत. कारण बांग्लादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती ही अशा उच्चस्तरीय बैठकीसाठी योग्य नसल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे.
एशिया कप जर रद्द झाला, तर इंग्लंड आणि श्रीलंका यांनी भारतासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी काही ना काही पर्याय उपलब्ध असणारच.