Mens Hockey World Cup 2018: कॅनडावर मात करुन भारत उपांत्यपूर्व फेरीत
उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी कॅनडाविरुद्ध विजय गरजेचा होता.
भुवनेश्वर: हॉकी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताने कॅनडाचा ५-१ असा दणदणीत धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामन्यातील पहिल्या तीन सत्रात कॅनडाने भारताला कडवी टक्कर दिली. पहिल्या काही मिनिटांत कॅनडाने भारताविरुद्ध आघाडीही घेतली होती. मात्र, चौथ्या सत्रात भारताने जोरदार खेळ करत कॅनडावर विजय मिळवला. भारताकडून चिंगलसेना सिंह, अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक तर ललित उपाध्यायने दोन गोल केले.
क गटात साखळी फेरीमध्ये आश्वासक कामगिरी केलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी कॅनडाविरुद्ध विजय गरजेचा होता. कॅनडाविरुद्ध भारताने २०१३ पासून आतापर्यंत ६ सामने खेळले. त्यापैकी ४ सामने भारताने जिंकले, एक हरला तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यापैकी एकाचेच रुपांतर गोलमध्ये झाले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारताला कॅनडाचा बचाव भेदण्यात अपयश आले. तिसऱ्या सत्रात कॅनडाने प्रतिहल्ला केल्यामुळे भारत बॅकफुटवर गेला. यानंतर चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी करत काही मिनिटांच्या फरकाने तीन गोल झळकावले.