'संघातील प्रत्येकजण घाबरून खेळतोय', कोलकाता टेस्ट पराभवानंतर भारताच्या माजी क्रिकेटरने केला खुलासा

IND VS SA : टीम इंडियाचा कोलकाता येथील पहिल्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. या पराभवानंतर आता टीम इंडियावर टीकेची झोड उडत असताना माजी क्रिकेटरने टीम मॅनेजमेंटवर अनेक आरोप केले आहेत.   

पूजा पवार | Updated: Nov 18, 2025, 03:28 PM IST
'संघातील प्रत्येकजण घाबरून खेळतोय', कोलकाता टेस्ट पराभवानंतर भारताच्या माजी क्रिकेटरने केला खुलासा
(Photo Credit : Social Media)

IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला गेला. यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेने टीम इंडियावर 30 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. मागील 15 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने भारतात प्रथमच टेस्ट सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाला बरीच टीका सहन करावी लागली. भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने टीम मॅनेजमेंटवर गंभीर आरोप केले आणि संघात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे असं म्हटलं.  

Add Zee News as a Preferred Source

संघातील प्रत्येकजण घाबरून खेळतोय : 

मोहम्मद कैफने आपल्या युट्युब चॅनलवर म्हटले की भारतीय संघात सर्वात जास्त कमतरता विश्वास आणि स्पष्टतेची आहे. त्याने स्पष्ट शब्दात म्हटले की, 'टीम इंडियात खूप संभ्रम आहेत. खेळाडूंमध्ये कमी आत्मविश्वास दिसतोय. प्रत्येकजण घाबरून खेळतोय, कोणालाच वाटत नाहीये की टीम मॅनेजमेंट त्यांच्या सोबत उभा आहे'. 

कैफने उदाहरण देऊन सांगितलं की, 'सरफराज खान एक शतक ठोकल्यावर संघात स्थान पक्कं करू शकला नाही. त्याला संधी दिल्या शिवायचं ड्रॉप करण्यात आलं. तिथेच साई सुदर्शनने मागच्या सामन्यात 87 धावा केल्या. त्याला सुद्धा पुढच्या टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही. मोहम्मद कैफच्या सांगण्यानुसार,  'जर एखाद्या खेळाडूला 100 धावा करूनही आत्मविश्वास मिळत नसेल तर इतर खेळाडूंना आत्मविश्वास कसा मिळेल?'

हेही वाचा : कोलकाता टेस्ट पराभवानंतर WTC Points Table मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर? WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी किती विजय आवश्यक?

 

स्पिनर्सच्या तयारीवर मोठा प्रश्न : 

मोहम्मद कैफने भारताच्या खराब फलंदाजी प्रदर्शनावरच नाही तर संघाच्या तयारीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांनी म्हटले की वॉशिंग्टन सुंदर यामुळेच टिकला कारण तो लहानपणापासून चेन्नईच्या टर्निंग ट्रैक्सवर खेळला. मोहम्मद कैफ म्हणाला की, 'सुंदरला माहित आहे की फिरकी गोलंदाजी करताना कधी फूटवर्क वापरायचे आणि कधी हात मऊ ठेवायचे. चेन्नईचे फलंदाज स्वाभाविकच फिरकी गोलंदाजांविरुद्ध मजबूत असतात'.

कैफचं म्हणणं आहे की, जर साई सुदर्शन नंबर 3 वर आणि सुंदर खालच्या क्रमवार खेळला असता तर भारताचा विजय झाला असता. तो म्हणाला की, 'सुदर्शन हा देखील चेन्नईचा आहे. तो फिरकी गोलंदाजी देखील चांगला खेळतो. सुदर्शन चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्याने 87 धावा केल्या होत्या, तरीही तो प्लेईंग 11 खेळाडूंमध्ये नाही. यावरून संघ व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेत गंभीर गोंधळ दिसून येतो'.

FAQ : 

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव किती धावांनी झाला?
उत्तर: दक्षिण आफ्रिकेने भारताला ३० धावांनी पराभूत केले.

 मोहम्मद कैफने टीम मॅनेजमेंटवर नेमके काय आरोप केले?
उत्तर: त्यांनी सांगितले की भारतीय संघात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. खेळाडूंमध्ये विश्वास व स्पष्टता नाही, प्रत्येकजण घाबरून खेळतोय कारण त्यांना वाटत नाही की मॅनेजमेंट त्यांच्या पाठीशी उभा आहे.

कैफने कोणत्या दोन खेळाडूंची उदाहरणे दिली ज्यांना योग्य संधी मिळाली नाही?
उत्तर: सरफराज खान (शतक ठोकूनही स्थान पक्के झाले नाही) आणि साई सुदर्शन (८७ धावा करूनही पुढच्या कसोटीत संधी मिळाली नाही).

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More