)
Mohammed Shami on Australia Tour: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 संघातून संघातून वगळल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मंगळवारी निवड समितीवर टीका केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघासाठी त्याची उपलब्धता तो तंदुरुस्त आहे हे सिद्ध करत आहे असं त्याने म्हटलं आहे. तसंच याबद्दल पॅनेलला अपडेट करणं हे माझं काम नाही असंही स्पष्ट सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा खेळताना दिसलेला आणि वरुण चक्रवर्तीसह देशाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून खेळणारा शमी 2023च्या विश्वचषकानंतर वारंवार होणाऱ्या घोट्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतींचा सामना करत आहे. त्याला यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. 35 वर्षीय शमी काही काळापासून भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. त्याने शेवटचा सामना जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळला होता.
"मी हे याआधीही म्हटलं आहे की, निवड होणं माझ्या हातात नाही. जर फिटनेसचा मुद्दा असे तर मी इथे बंगालसाठी खेळत नसतो," असं मोहम्मद शमीने ईडन गार्डन्सवर उत्तराखंडविरुद्ध बंगालच्या रणजी सलामी सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
असे 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिा दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून वगळल्याबद्दल विचारलं असता त्याने उत्तर दिलं की, "मला वाटतं की मला यावर बोलण्याची आणि वाद निर्माण करण्याची गरज नाही. जर मी चार दिवसांचे सामने (रणजी ट्रॉफी) खेळू शकतो, तर मी 50 षटकांचे क्रिकेट देखील खेळू शकतो".
"माझं काम एनसीएला (National Cricket Academy) जाणं, तयारी करणं आणि सामने खेळणं आहे. आता त्यांना कोण अपडेट देतं, कोण देत नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ही माझी जबाबदारी नाही," असं त्याने एनसीएने फिटनेस प्रमाणपत्रे जारी करावीत या नियमाचा संदर्भ देत तो स्पष्टपणे म्हणाला.
2023 च्या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक 24 बळी घेणारा हा अनुभवी वेगवान गोलंदाज टाचेला दुखापत झाली आणि त्याच्या अॅकिलीस टेंडनवर उपचार करण्यासाठी त्याला जावे लागले. गुडघ्याच्या वारंवार दुखण्यामुळे ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला दुर्लक्षित करण्यात आलं होतं. परंतु या वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला.
या हंगामात दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनकडून खेळताना पुन्हा एकदा पुनरागमन करणारा बंगालचा वेगवान गोलंदाज म्हणाला की त्याने शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनानंतर योग्य प्रक्रिया पाळली आहे आणि काही काळापासून तो सामन्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघात बदल घडत असून शमी आशावादी आहे, मात्र व्यवहारिकपणे विचार करत आहे.
"मी नेहमीच म्हणतो की तुम्ही तुमच्या देशासाठी सर्वोत्तम संघ निवडला पाहिजे. हा देशाचा प्रश्न आहे. देश जिंकला पाहिजे. आपण सर्वांनी आनंदी असले पाहिजे. मी नेहमीच हेच म्हणतो," अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
"लढत राहा, खेळत राहा. जर तुम्ही चांगले प्रदर्शन केलं तर त्याचा तुम्हालाही फायदा होईल. निवड माझ्या हातात नाही. मी फक्त तयारी करू शकतो आणि सामने खेळू शकतो. मला काही हरकत नाही... जर तुम्ही मला निवडले नाही तर मी इथे येऊन बंगालसाठी खेळेन. मला त्यात काही हरकत नाही," असंही तो पुढे म्हणाला.
क्रिकेटसारख्या खेळात खेळाडू नेहमीच सातत्यपूर्ण राहू शकत नाहीत असं शमीने सांगितलं. "मला वेदना सहन करून खेळायचे नाही किंवा संघाला त्रास द्यायचा नाही. शस्त्रक्रियेनंतर मला परत यायचे होते आणि एक मजबूत पुनरागमन करायचे होते. मीही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे असं शमी म्हणाला.
"जेव्हा सिलेक्टर्स सांगतील तेव्हा तेव्हा मी खेळण्यास तयार आहे," असं त्याने स्पष्ट केलं. शमीने 64 कसोटी, 108 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत.
शमीने आपण अजूनही देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देतोस कारण तो कोणत्याही क्रिकेटपटूसाठी खरा कसोटी सामना असतो असं सांगितलं. "जुन्या काळात, रणजी ट्रॉफी हा प्रत्येकासाठी एक मोठा स्तर होता. पण आज, आपल्याकडे एक व्यासपीठ आहे आणि तुम्हाला वाटते की रणजी ट्रॉफीसारखे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी परत जाणे हा अपमान आहे. मला तसे वाटत नाही. तुम्ही चार दिवसांचे क्रिकेट खेळले पाहिजे," असं तो म्हणाला.
"जर अशी अट असेल की तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये कामगिरी केली तर तुम्ही संघात असाल, तर त्यात काहीही चुकीचे नाही. निःसंशयपणे, तुम्ही चांगली कामगिरी केली पाहिजे," असं शमी पुढे म्हणाला.