)
Mohammed Shami once injured Smriti Mandhana : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या धारदार आणि स्विंगने भरलेल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चेंडूवर वेग आणि अचूकतेचं विलक्षण मिश्रण दिसतं. अनेक नामांकित फलंदाज त्याच्या बॉलिंगसमोर गोंधळतात, पण एकदा त्याच्या वेगवान चेंडूचा फटका थेट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार ओपनर स्मृती मंधाना हिला बसला होता. हा किस्सा स्वतः शमीने एका मुलाखतीत सांगितला होता आणि तो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
शमीने सांगितलं की, “2015 वर्ल्डकपनंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्या काळात मी रिहॅब प्रक्रियेत होतो. महिला क्रिकेट टीम आमच्या मैदानावर सरावासाठी आली होती. फिजिओने सांगितलं होतं की, ‘थोडक्याच रनअपवरून चार-पाच ओव्हर टाक.’ मी म्हटलं, ‘असं एकट्यानं बॉलिंग करणं कंटाळवाणं वाटतं, मला बॅटर हवाय.’ तेव्हा महिला टीमच्या खेळाडूंनी सरावासाठी सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.”
शमी पुढे म्हणाला, “सगळ्यांना वाटलं की मी चार-पाच पावलांच्या रनअपवरून गोलंदाजी करणार, त्यामुळे फार वेग येणार नाही. माझं गुडघं तसंही पूर्ण बरे झालं नव्हतं. मी पहिल्या दोन चेंडू आउटस्विंग टाकले मंधाना दोन्ही वेळा बीट झाली. त्यानंतर मी एक इनस्विंगर टाकला आणि तो थेट तिच्या इनर थायवर जाऊन लागला. मला इतकं वाईट वाटलं की मी लगेच मैदान सोडलं. मंधाना जखमी झाली होती आणि फिजिओ लगेच तिच्याकडे धावला.”
सध्या मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकांसाठी त्याची निवड झाली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्या स्पर्धेत त्याने 9 विकेट घेतल्या होत्या, पण त्यानंतर IPL मध्ये त्याला चांगली मार बसली आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही.
मोहम्मद शमीच्या बॉलिंगचा मुख्य आधार म्हणजे त्याचा स्विंग आणि सातत्य. तो फिटनेसवर परत आला की भारतीय गोलंदाजी आघाडीला पुन्हा धार मिळू शकते. स्मृती मंधानासोबतचा हा किस्सा आजही क्रिकेटप्रेमींच्या चर्चेत आहे, कारण त्यातून दिसतं की शमीचा चेंडू किती घातक आणि प्रभावी ठरू शकतो.