...तर महिला क्रिकेटचे सामने होऊच दिले नसते; 'त्या' विधानाने खळबळ! यामागे BCCI कनेक्शन

Women Cricket: भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर या मोठ्या अधिकाऱ्याचं विधान पुन्हा चर्चेत आलं असून त्यावरुन जोरदार मतप्रदर्शन होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलेलं जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2025, 03:07 PM IST
...तर महिला क्रिकेटचे सामने होऊच दिले नसते; 'त्या' विधानाने खळबळ! यामागे BCCI कनेक्शन
जुनी आठवण सांगताना केला उल्लेख (प्रातिनिधिक फोटो)

Women Cricket: रविवारी भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत आपलं पहिलंवहिलं विश्वचषक पद पटकावलं. एकीकडे भारतीय महिला संघाचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे एक जुनं विधान या विजयाच्यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आलं आहे. श्रीनिवासन यांनी भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांच्याशी बोलताना महिला क्रिकेटबद्दल वादग्रस्त विधान केलंल. "मी भारतात महिला क्रिकेट कधीही वाढू देणार नाही," असं श्रीनिवास म्हणाले होते. 

Add Zee News as a Preferred Source

भारताचा विजय

रविवारी, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला 50 ओव्हरमध्ये 7 बाद 298 धावांपर्यंत पोहोचवलं. दुखापतग्रस्त सलामीवीराच्या जागी संघात बदली खेळाडू म्हणून आलेल्या वर्माने 78 चेंडूत कारकिर्दीतील सर्वोत्तम 87 धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने 39 धावांत 5 गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांत गुंडाळला.

महिला क्रिकेटचा तिरस्कार करणारं नेतृत्व

मात्र महिला क्रिकेटवरोधात भूमिका घेणारं एक नेतृत्व एन. श्रीनिवासन यांच्या माध्यमातून बीसीसीआयच्या प्रमुखपदी राहून गेलं आहे. त्यांनी आपली भूमिका कधीच लपवून न ठेवता थेट ऐकूनही दाखवली आहे. असेच त्यांनी एका भेटीदरम्यान माजी कर्णधार डायना यांना ऐकून दाखवलं. या भेटीसंदर्भातील आठवणीला आणि भेटीत झालेल्या चर्चेला डायना यांनी उजाळा दिला. "जेव्हा श्रीनिवासन अध्यक्ष झाले तेव्हा मी वानखेडे स्टेडियमवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले होते. ते म्हणाले, 'जर माझ्या मर्जीने चालले असते तर मी महिला क्रिकेट आयोजित होऊच दिले नसते.' त्यांना महिला क्रिकेटचा तिरस्कार आहे," असं डायना म्हणाल्या.

नक्की वाचा >> Periods च्या वेळी काय करता? जेमिमाने दिलेलं उत्तर चर्चेत; 'मासिक पाळीदरम्यान आम्ही आमच्या...'

मी नेहमीच बीसीसीआयविरोधात

"2006 मध्ये महिला क्रिकेट बीसीसीआयच्या अखत्यारीत आल्यापासून मी नेहमीच बीसीसीआयविरोधात राहिली आहे. बीसीसीआय ही एक पुरुषप्रधान संघटना आहे. त्यांना कधीही महिलांनी या क्षेत्रात यावे असे वाटत नव्हते. मी माझ्या खेळण्याच्या दिवसांपासून सातत्याने याबद्दल बोलत आले आहे," असं पुढे डायना म्हणाल्या.

हरमनप्रीतही टीकेवरुन बोलली

विश्वचषक विजेत्या कर्णधार हरमनप्रीत कौरने सतत्याने महिला संघावर होणारी टीका हाताळण्यासंदर्भात भाष्य केलं. “मला वाटते की टीका देखील जीवनाचा एक भाग आहे. सर्वकाही चांगले असले पाहिजे असं आवश्यक नाही. टीका ही जीवनातील मुख्य गोष्टींपैकी एक आहे कारण ती जीवनात संतुलन आणते. अन्यथा, जर सर्वकाही चांगले झाले तर तुम्ही अतिआत्मविश्वासू होता. हे घातक आहे. टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही, कारण आपण कधी काहीतरी बरोबर करत नाही हे आपल्याला त्यांच्यामुळेच माहित होतं," असं हरमनप्रीत म्हणाली.

“माझ्याकडे सांगण्यासारखे फार काही नाही, पण मला दोन्ही गोष्टी संतुलित ठेवायला आवडतात. जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा मी जास्त भारावून जात नाही; जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा मी त्यात फारशी अडकून पडत नाही. माझ्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संतुलन राखणे आणि मी माझ्या सहकाऱ्यांनाही हाच संदेश देण्याचा प्रयत्न करते. जेव्हा सर्व काही ठीक चालले असते - ते बरं वाटतं, ते चांगले कसे केले यावर आपण बोलतो. जेव्हा गोष्टी ठीक नसतात तेव्हाही आपण सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपण त्या व्यक्तीला पुन्हा प्रोत्साहन देण्यात यशस्वी ठरु,” असं हरमनप्रीतने तिच्या भूमिकेसंदर्भात सांगितलं.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More